पडद्यावरचा ‘बॅडमॅन’ वास्तवात मात्र भावुक!

By Admin | Published: April 15, 2016 01:46 AM2016-04-15T01:46:40+5:302016-04-15T01:46:40+5:30

बॉलीवूडचा ‘बॅडमॅन’ म्हणजे गुलशन ग्रोवर. सुमारे ४०० वर चित्रपटांमधून ‘खलनायक’ साकारल्यानंतर गुलशन ग्रोवर बॉलीवूडचे ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि कालांतराने

Badman is really emotional on the screen! | पडद्यावरचा ‘बॅडमॅन’ वास्तवात मात्र भावुक!

पडद्यावरचा ‘बॅडमॅन’ वास्तवात मात्र भावुक!

googlenewsNext

पहिल्या वेब मुव्हीच्या निमित्ताने सीएनएक्सशी मनमोकळ्या गप्पा

बॉलीवूडचा ‘बॅडमॅन’ म्हणजे गुलशन ग्रोवर. सुमारे ४०० वर चित्रपटांमधून ‘खलनायक’ साकारल्यानंतर गुलशन ग्रोवर बॉलीवूडचे ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि कालांतराने हीच त्यांची ओळख बनली. विशेष म्हणजे, गुलशन ग्रोवर यांनी ही ओळख अतिशय अभिमानाने मिरवली. बॉलीवूडने अमिताभ बच्चन यांना अँग्री यंगमॅनची ओळख दिली. शाहरूखला ‘राज’ तर सलमान खानला ‘प्रेम’ अशी ओळख दिली. पण अद्याप यापैकी कुठल्याही कलाकाराच्या लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या नावावरून चित्रपटाचे नाव ठेवले गेले नाही. पण गुलशन ग्रोवर यांच्या ‘बॅडमॅन’ याच नावाचा चित्रपट आपल्याला येत्या काळात पाहता येणार आहे. ‘बॅडमॅन’ हे या चित्रपटाचे नाव आहे, ‘बॅडमॅन’ हाच चित्रपटाचा आधार आहे आणि ‘बॅडमॅन’ ओळख लाभलेले गुलशन ग्रोवर हेच या चित्रपटाचे हीरो आहेत. ‘बॅडमॅन’चे वैशिष्ट्य म्हणजे ही एक वेब मुव्ही आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने गुलशन ग्रोवर यांनी लोकमत ‘सीएनएक्स’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रश्नोत्तर स्वरूपातील गुलशन ग्रोवर यांची ही खास मुलाखत...

‘बॅडमॅन’मध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण पाहायला मिळणार?
बॉलीवूडमधील माझ्या खलनायकांच्या भूमिकांनी मला ‘बॅडमॅन’ हे नाव दिले. माझ्या याच नावाने चित्रपट येतोय आणि यात मी स्वत: हीरो आहे. या चित्रपटात माझे नाव ‘गुलशन ग्रोवर, बॅडमॅन’ आहे. पण हा चित्रपट वास्तव आणि कल्पना यांचे मिश्रण आहे. त्यामुळे हा चित्रपट आपल्यात एक वेगळा असा चित्रपट ठरेल हे नक्की.
‘बॅडमॅन’ला गुलशन ग्रोवर यांचे बायोपिक म्हणता येईल?
नाही. बायोपिक नाही. ‘बॅडमॅन’मध्ये माझे खरे नाव असले तरी यात अनेक काल्पनिक गोष्टी आहेत. यात ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ, कुणाल रॉय कपूर, महेश भट्ट, मनीषा कोईराला असे अनेक मोठे कलाकार अतिथी भूमिकेत (गेस्ट अपिअरन्स) दिसणार आहेत. ऋषी कपूर यांचे नाव चित्रपटातही ऋषी कपूर हेच आहे. हा चित्रपट म्हणजे ‘बॅडमॅन’भोवती गुंफलेली काल्पनिक कथा आहे.
‘बॅडमॅन’ हा वेब मुव्हीचा पहिलाच प्रयोग आहे. काय सांगाल?
हे डिजिटल युग आहे. आतापर्यंत डिजिटल प्रेक्षकांना चित्रपट म्हणून जुना-पुराना माल दाखवला जात होता. सिनेमागृहात झळकलेला, टीव्हीवर आलेला चित्रपट इंटरनेटच्या प्रेक्षकांना दाखवला जायचा. पण श््रंूङ्मे18 ने प्रथमच ‘बॅडमॅन’च्या रूपात आपल्या डिजिटल प्रेक्षकांना काही तरी वेगळे व नवे देण्याचा प्रयत्न आहे. डिजिटल युग हेच भविष्य असेल तर डिजिटल व्युवर्सलाही सन्मानपूर्वक वागणूक मिळायला हवी. त्यामुळेच डिजिटल प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण चित्रपट बनवला आहे. हा भारतीय सिनेमातील पहिला प्रयोग आहे. ‘बॅडमॅन’ लोकांना आवडलाच तर यानिमित्ताने अनेकांना वेब मुव्हीच्या माध्यमातून एक नवा प्लॅटफॉर्म मिळू शकेल. अनेकांकडे चांगल्या स्क्रिप्ट आहेत, पण प्लॅटफॉर्म नाही. अशा स्थितीत वेब मुव्ही हे नवे माध्यम अनेकांच्या कलागुणांना वाव देणारे ठरेल. मी या प्रक्रियेचा भाग ठरत असेल तर याचा मला आनंद आहे.
गुलशन ग्रोवर स्वत:ला रिलॉन्च करताहेत, अशीही चर्चा आहे?
रिलॉन्च हा चित्रपटाचा एक भाग आहे. आज चित्रपटातून खलनायक गायब झाले आहेत. अशा स्थितीत माझ्यासारखा एक खलनायक हीरो म्हणून येणे वेगळी गोष्ट आहे.
गुलशन ग्रोवर हा ‘बॅडमॅन’ व्यक्तिगत आयुष्यात कसा आहे?
मी कॉमन मॅनचे एक उदाहरण आहे. कला, काम, कष्ट आणि परमेश्वराची कृपा या जोरावर मी एवढे मोठे यश मिळवले. माझे हे यश म्हणजे लोकांच्या प्रेमाची पावती आहे. मी पडद्यावर बॅडमॅन असलो तरी घरात अतिशय भावुक सदस्य आहे. मला प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट लागते. त्यामुळे घरातही मी हे परफेक्शन आणण्यासाठी लक्ष घालत असतो. मग ती घराची साफसफाई असो वा घराशी निगडित अन्य कामे.
शूटिंग नसेल तर गुलशन ग्रोवर काय करतात?
शूटिंग नसेल तर फावला वेळ मिळतोच, असे नाही. पण मिळालाच तर माझा बराचसा वेळ जिममध्ये जातो. येणाऱ्या चित्रपटांची तयारी, कपड्यांची ट्रायल अशी कामे सुरू असतात. याशिवाय घरातील अनेक कामांत मी जातीने लक्ष घालतो.
काम आणि कुटुंब यात संतुलन कसे साधता?
काम आणि कुटुंब यात संतुलन साधणे अतिशय कठीण आहे. माझ्या कुटुंबाने मला सांभाळून घेतले आहे. त्यांना वेळ देऊ शकत नाही, पण ते सांभाळून घेतात. अनेक तासांचा प्रवास, कामाच्या विचित्र वेळा, वेगवेगळ्या अफवा या सगळ्यांत कुटुंब तुमच्या पाठीशी हवे. माझ्या यशात निश्चितपणे त्यांचा मोठा वाटा आहे.

Web Title: Badman is really emotional on the screen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.