VIDEO: तिकडून आली मोनिका आणि...., सुमीत पुसावळेनं लग्नात बायकोसाठी घेतला धम्माल उखाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 04:20 PM2022-12-16T16:20:57+5:302022-12-16T16:21:36+5:30
Sumeet Pusavale : ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मराठी मालिकेतील ‘बाळूमामा’ अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे नुकताच लग्नबंधनात अडकला.
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balumama Chya Navan Chang Bhala) या लोकप्रिय मराठी मालिकेतील ‘बाळूमामा’ अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे (Sumeet Pusavale ) नुकताच लग्नबंधनात अडकला. सुमीतने मोनिका महाजनसोबत लग्नगाठ बांधली. 14 डिसेंबरला पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि आता काय तर सुमीतने बायकोसाठी घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
सुमीत व मोनिका यांनी सांगोला येथे पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. आता लग्न म्हटलं की उखाणा आलाच. सुमीतला सुद्धा लग्नमंडपात उखाणा घेण्याचा आग्रह झाला आणि सुमीत असा काही उखाणा घेतला की त्याची ‘मोनिका’ही त्याच्यावर फिदा झाली. तिनेही सुमीतला हसत हसत दाद दिली.
‘दिघंजीच्या गल्लीमध्ये खेळत होतो क्रिकेट.. तिकडून आली मोनिका आणि पडली माझी विकेट...,’ असा भन्नाट उखाणा सुमीतने घेतला आणि तो ऐकून नवरीही लाजली. सुमीतच्या उखाण्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
अभिनेता सुमीत पुसावळे याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. लागिर झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे. ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळतो आहे. सुमित पूसावळे हा मूळचा दिघंजी गावचा. शालेय शिक्षणानंतर सुमित पुण्यात आला. इथे त्याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली आणि काही काळ याच क्षेत्रात नोकरी केली. त्याला स्वत:चं रेस्टॉरंट उभारायचं होतं. मात्र लहानपणापासूनच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानं त्याच्यात कलेची आवड निर्माण झाली.