‘बंगिस्तान’ची कमाई ३ कोटी
By Admin | Published: August 11, 2015 04:21 AM2015-08-11T04:21:30+5:302015-08-11T04:21:30+5:30
धर्म आणि दहशतवाद हा विषय घेऊन तयार झालेल्या ‘बंगिस्तान’ला प्रेक्षकांनीच निकाली काढले. फरहान अख्तरच्या कंपनीने बनविलेल्या या चित्रपटाची बॉक्स आॅफिसवरील सुरुवात फारच सुस्त होती
धर्म आणि दहशतवाद हा विषय घेऊन तयार झालेल्या ‘बंगिस्तान’ला प्रेक्षकांनीच निकाली काढले. फरहान अख्तरच्या कंपनीने बनविलेल्या या चित्रपटाची बॉक्स आॅफिसवरील सुरुवात फारच सुस्त होती व आठवड्याच्या शेवटच्या तिन्ही दिवसांत त्याची परिस्थिती पहिल्या दिवशीसारखीच होती. व्यवसायाचा विचार केला तर तीन दिवसांत ‘बंगिस्तान’ने जवळपास ३ कोटींची कमाई केली. परंतु वाईट बाब ही की चित्रपट बघणाऱ्यांनी त्याबद्दल निराशा व्यक्त केली व पर्यायाने प्रेक्षकांची संख्या घटत गेली. २०१५ मध्ये फ्लॉप झालेल्या चित्रपटांच्या यादीत ‘बंगिस्तान’चा समावेश झाला. उमराव जान तयार करणाऱ्या मुज्जफर अली यांचा ‘जानिस्सार’ही बॉक्स आॅफिसवर काही प्रभाव टाकण्यात अपयशी ठरला.मागे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा विचार केला तर काही दाक्षिणात्य भाषांमध्ये तयार होऊन नंतर हिंदीमध्ये केलेल्या गूढ व थ्रिलर ‘दृश्यम’ला पहिल्या आठवड्यात सरासरी यश मिळाले. जवळपास ३० कोटी रुपयांचा व्यवसाय केल्यानंतर ‘दृश्यम’च्या कमाईच्या आकड्यांत घट होत गेली. दुसऱ्या वीकेंडच्या समाप्तीपर्यंत त्याचा व्यवसाय ४८ कोटींचा झाल्याचे समजले जाते. या आकड्यावरून त्याचे यश सरासरी समजले जात आहे. अजय देवगणसारखा अभिनेता असल्यामुळे ‘दृश्यम’ला चांगले यश मिळेल, अशी आशा होती. अंदाज असा व्यक्त होत आहे की, बॉक्स आॅफिसवर याची कमाई जवळपास ५० कोटींपर्यंत जाऊन थांबेल. ऋचा चढ्ढाचा ‘मसान’ आधीच बॉक्स आॅफिसच्या स्पर्धेतून बाद झाला आहे.
सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’बद्दल बोलायचे तर तिसऱ्या आठवड्यात ३०० कोटी रुपयांची कमाई असलेल्या क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई ३१० कोटी रुपयांची झाली आहे.
कमाईमध्ये सगळ्यात पुढे गेलेल्या ‘बाहुबली’च्या हिंदी आवृत्तीची कमाई ११० कोटी रुपयांची झाली आहे. ‘बाहुबली’च्या सगळ्या भाषांतील आवृत्त्यांची कमाई ५०० कोटींची सीमा ओलांडून गेली आहे. येत्या शुक्रवारी करण जोहर कंपनीचा अक्षय कुमार व सिद्धार्थ मल्होत्राचा अॅक्शन चित्रपट ‘ब्रदर’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.