जगभरातील सुंदरी पुन्हा भारतात येणार! मिस वर्ल्ड स्पर्धेचे यजमानपद जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 07:41 PM2023-06-08T19:41:52+5:302023-06-08T19:43:41+5:30
miss world 2023: मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने गुरुवारी याची माहिती दिली. विश्वसुंदरी स्पर्धा २०२३ ही ७१ वी स्पर्धा आहे.
जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी एक, 1951 पासून दरवर्षी आयोजित केली जाणारी मिस वर्ल्ड स्पर्धा पुन्हा एकदा भारतात होणार आहे. यंदाच्या यजमानपदासाठी भारताची निवड झाल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे.
धर्मादाय कार्यांना प्रोत्साहन देताना सौंदर्य, प्रतिभा आणि बुद्धिमत्ता सादर करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने गुरुवारी याची माहिती दिली. विश्वसुंदरी स्पर्धा २०२३ ही ७१ वी स्पर्धा आहे. भारताने यापूर्वी 1996 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतात २७ वर्षांनी पुन्हा एकदा यजमानपद आले आहे. जवळपास महिनाभर ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत भारतासह १३० देशांच्या सुंदऱ्या सहभाग घेणार आहेत.
विश्व सुंदरी स्पर्धा नोव्हेंबरमध्ये होणार असून याच्या तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत. त्या नंतर जाहीर केल्या जातील. तसेच जागाही ठरलेली नाही, असे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी सांगितले. भारताचे मिस इंडिया वर्ल्ड सिनी शेट्टी प्रतिनिधित्व करणार आहे.