#BharatRatnaForBachchan
By Admin | Published: October 11, 2015 04:10 AM2015-10-11T04:10:04+5:302015-10-11T13:06:58+5:30
अमिताभ नावाच्या सर्वमान्य महानायकाला ‘भारतरत्न’ मिळाले, तर फारसे वादही होणार नाहीत. जातीय-धार्मिक भावना कमालीच्या टोकदार होत असल्याचे चित्र देशभर आहे.
अमिताभ नावाच्या सर्वमान्य महानायकाला ‘भारतरत्न’ मिळाले, तर फारसे वादही होणार नाहीत. जातीय-धार्मिक भावना कमालीच्या टोकदार होत असल्याचे चित्र देशभर आहे. यावर फुंकर घालण्याची ताकद अमिताभच्या ‘भारतरत्न’मध्ये आहे.
जात, धर्म, प्रांत, भाषा, संस्कृती या सर्व भेदांपलीकडे जाऊन देशाला एका सूत्रात बांधण्याची किमया क्रीडा-कलेच्या माध्यमातून होते. अमिताभ यांनी त्यांच्या अफाट लोकप्रियतेमधून राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य साधले. माणसे जोडण्याचे काम त्यांच्या अभिनयाने केले. ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना जीवघेणी दुखापत झाली, तेव्हा अमिताभसाठी मंदिरांमधे नवस बोलले गेले, पीरांना चादर चढवली गेली, चर्चमधल्याही घंटा निनादल्या. अमिताभच्या अफाट लोकप्रियतेची जशी ही खूण होती, तसेच सर्व भिंती तोडून सर्वांच्या हृदयात त्यांनी मिळविलेल्या स्थानाचेही द्योतक होते.
‘स्टार आॅफ द मिलेनियम’ म्हणून गौरविलेले महानायक अमिताभ बच्चन यांचा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने महासन्मान व्हावा, ही कोट्यवधी भारतीयांची इच्छा असून बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ही अमूल्य भेट त्यांना मिळावी, अशी अपेक्षा त्यांचे चाहते व्यक्त करीत आहेत. ‘भारतरत्न फॉर अमिताभ’ ही एक लोकचळवळच सोशल साइटवर या माध्यमातून सुरू झाली आहे. अमिताभ बच्चन यांचे वैशिष्ट्य काय? अगदी सामान्याप्रमाणे आयुष्याला सुरुवात करून स्वत:च्या कर्तृत्वाने ते आज शिखरावर पोहोचले आहेत. अभिनयाचा महामेरू असलेला हा महानायक केवळ आपल्या चित्रपट कारकिर्दीने नव्हे, तर त्याच्या अंगी असलेल्या विनम्रता, सचोटी आणि सार्वजनिक जीवनातील शिष्टाचाराने कोट्यवधी भारतीय तरुणांचा खरा आयकॉन बनला आहे. अमिताभ बच्चन यांचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या सत्तराव्या वर्षीही ते चित्रपटसृष्टीतील कोणाही अभिनेत्यापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या आणि मायापुरी म्हणविल्या जाणाऱ्या चित्रपटसृष्टीतील हा महानायक ‘मोस्ट ट्रस्टेड ब्रॅँड आॅफ इंडिया’ म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीयतेच्या सीमा ओलांडून फॅन फॉलोअर असणारे अमिताभ हे पाकिस्तानपासून, बांगलादेशपासून आशियातील आणि जगातील सर्वच देशांत तितकेच लोकप्रिय आहेत. १९९९मध्ये चार्ली चॅप्लिन, मार्लन ब्रॅँडो यांच्यावर मात करून बीबीसीच्या पोलमध्ये ‘सुपरस्टार आॅफ द मिलियन’ हा सन्मान त्यांना मिळाला. १९८४मध्येच पद्मश्री अॅवॉर्डने त्यांना गौरविले होते. तर २००१मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. २०१४मध्ये पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच्याही पुढे जाऊन फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘नाइट आॅफ द लेजियन आॅफ द आॅनर’ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यामुळेच भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार त्यांना मिळावा, ही त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.
अमिताभ बच्चन कोट्यवधी भारतीय तरुणांचा उद्गार ठरले. सभोवतालची व्यवस्थाच बिघडलेली असताना सचोटीने ती बदलण्याचा प्रयत्न करणारा त्यांचा ‘अॅँग्री यंग मॅन’ त्यामुळेच युवकांना भावला. विशेष म्हणजे, तो कालातीत ठरला. काळाची आणि भाषेची बंधने तोडून सर्वकालिक अपील त्यांनी निर्माण केले. भारतीयांच्या किमान पाच पिढ्यांसाठी ते आयकॉन ठरले. आजही राज्य-भाषा-जात-पंथ या सीमा ओलांडून जर राष्ट्रीय अपील कोणाला असेल, तर अमिताभ बच्चन यांच्याशिवाय
नाव नाही. सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट, लता मंगेशकर
यांचे गाणे ऐकताना संपूर्ण देश एक असतो, तसेच दृश्य अमिताभ बच्चन यांचा पडद्यावरचा अभिनय पाहताना दिसते. अमिताभ बच्चन यांनी अनेकांच्या जगण्याला आधार दिला. अमिताभ बच्चन यांना कोट्यवधी जनतेकडून लोकप्रियतेचा सन्मान मिळाला; मात्र जागतिक पातळीवरही आपल्या कर्तृत्वाने त्यांनी भारताची मान उंच केली. २०१३मध्ये प्रतिष्ठित ‘टाइम’ मॅगझिनने त्यांना ‘द अनडिस्पुटेड गॉडफादर आॅफ बॉलीवूड’ म्हणून गौरविले. भारतीयांसाठी आयकॉन ठरलेले, भारताचे नाव जगात उंचावणारे, भारतीयत्वाचा सन्मान वाढविणारे अमिताभ
बच्चन यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन कोट्यवधी भारतीयांची मान उंचावावी, हीच प्रत्येक भारतीयाची मनोमन इच्छा आहे. अमिताभ बच्चन हे केवळ पडद्यावरील हीरो कधीच राहिले नाहीत, तर एक पुत्र, पती, पिता, चांगला मित्र, अभिनेता म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनातील दंडक निर्माण केले. खासदारपदाच्या कारकिर्दी वेळी लोक काही वेगळे बोलायला लागल्यावर त्यांनी आयुष्यभरासाठी राजकारण सोडून दिले.
आवाजाची जादू : अमिताभ बच्चन यांच्या आवाजाच्या जादूने भारतीयांना वेड लावले. अत्यंत शुद्ध आणि स्पष्ट शब्दोच्चार आणि खर्जातील आवाजाने त्यांनी अनेक भूमिका जिवंत केल्या. त्याचबरोबर, अनेक गाणीही त्यांच्या आवाजाने अमर झाली. ‘रंग बरसे’, ‘मेरे अंगने में’ ही गाणी तर होतीच; पण ‘मैं और मेरी तनहाई’ तरुणांच्या हृदयातील मर्मबंधातील ठेव बनली. वयाच्या ७२व्या वर्षीही ‘शमिताभ’मध्ये त्यांनी गायलेले गाणे लोकप्रिय ठरले.
अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता किंवा त्यांचा देश-विदेशांत केला गेलेला सन्मान याच्यापेक्षाही त्यांनी आपल्या आदर्श आयुष्याने सार्वजनिक जीवनात जे मानदंड निर्माण केले ते महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशी माझा स्वत:चा एक अनुभव एक माणूस म्हणून अमिताभ बच्चन यांची महती किती होती, हे दर्शविणारा होता. लोकमत मीडिया प्रा. लि.च्या वतीने २०११मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी त्यांना घरापासून रिसीव्ह करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना अनेकदा भेटण्याचा योग मला आला होता. मात्र, या घरच्या भेटीत त्यांच्या अदबशीर वागणुकीने हा महानायक प्रत्यक्ष जीवनात मानवता किती जपतो, याचा प्रत्यय मला आला. त्यांनी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती माझ्याकडून जाणून घेतलीच; शिवाय लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्यासोबतच्या आठवणी सांगून मला अगदी कुटुंबातील असल्यासारखे करून टाकले. जणू काही मी त्यांचा वर्षानुवर्षांचा परिचित आहे, असे वातावरण त्यांनी निर्माण केले. विशेष म्हणजे, हे सगळे अकृत्रिम होते; त्यामध्ये कोठेही अभिनिवेश नव्हता.
- milan.darda@lokmat.com