भाऊ कदम यांनी कानाला खडा या कार्यक्रमात सांगितले त्यांच्या आयुष्यातील हे गुपित...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 04:49 PM2018-11-28T16:49:52+5:302018-11-28T16:52:24+5:30
कानाला खडा या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागाचे पाहुणे खूप खास असणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात भाऊ कदम संजय मोने यांच्याशी गप्पा मारायला येणार आहेत.
झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे लवकरच झी मराठीवर चला हवा येऊ द्या, आम्ही सारे खवय्ये आणि होम मिनिस्टर नंतर अजून दोन नवे कथाबाह्य कार्यक्रम सादर होणार आहेत. त्यातील एक कार्यक्रम हा चॅट शो असणार आहे. त्या कार्यक्रमाचं नाव 'कानाला खडा' असं आहे. या चॅट शो मध्ये कलाकारांशी गप्पा मारण्यासाठी आणि त्यांची टर खेचण्यासाठी एखादं मिश्किल व्यक्तिमत्वच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असलं पाहिजे असे टीमचे म्हणणे होते आणि त्यामुळेच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कानाला खडा लावणारे किस्से संजय मोने आणि सेलिब्रेटींच्या गप्पांमध्ये रंगणार आहेत. हा कार्यक्रम ३० डिसेंबरपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागाचे पाहुणे खूप खास असणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात भाऊ कदम संजय मोने यांच्याशी गप्पा मारायला येणार आहेत. चला हवा येऊ द्या मधून जगभरात प्रेक्षकांच्या घरघरात पोहोचलेला एक अवलिया विनोदवीर म्हणजे भाऊ कदम. सगळ्यांचा आवडता कलाकार भाऊ याचे किस्से देखील तितकेच भन्नाट आहेत.
संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारताना भाऊ कदमने त्याच्या बालपणीचा असा एक किस्सा सांगितला ज्यानंतर भाऊने कानाला खडा लावला आणि ती गोष्ट परत न करण्याचा निर्णय घेतला. भाऊ कदम शाळेत असताना शाळा बुडवून चित्रपट पाहायला जात असत. पण एके दिवशी त्याच्या बाबांना ही गोष्ट कळली आणि त्यानंतर काय घडलं हे प्रेक्षकांना पाहता येईल कानाला खडा या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात. तसंच शनिवारच्या भागात तरुणांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिचे कानाला खडे लावणारे किस्से देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करतील यात शंकाच नाही.
संजय मोने त्यांच्या या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहेत. त्यांच्या नव्या भूमिकेबद्दल ते सांगतात, "आजवर प्रेक्षकांनी माझी प्रत्येक भूमिका स्वीकारली आणि त्यांच्या प्रेमाने माझ्या कामाची पोचपावती देखील दिली. कलाकारांशी गप्पा मारायला मी सज्ज आहे. माझं आणि झी मराठीचं नातं खूप जुनं आहे आणि मी झी मराठीचा आभारी आहे की त्यांनी माझी या सूत्रसंचालकाच्या भूमिकेसाठी निवड केली."