छोट्या शहरातील सामान्य मुलीची मोठी झेप
By Admin | Published: October 23, 2016 04:14 AM2016-10-23T04:14:19+5:302016-10-23T04:14:19+5:30
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने मॉडेलिंगसारख्या ग्लॅमरस क्षेत्रात काम करणे वाटते तितके सोपे नाहीच; पण आपले सौंदर्य आणि बुद्धीच्या बळावर नागपूरची
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने मॉडेलिंगसारख्या ग्लॅमरस क्षेत्रात काम करणे वाटते तितके सोपे नाहीच; पण आपले सौंदर्य आणि बुद्धीच्या बळावर नागपूरची लोपामुद्रा राऊत हिने हे करून दाखविले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेता-घेता लोपामुद्राने मॉडेलिंगमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि प्रचंड चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा निर्णय तडीसही नेला. हीच लोपामुद्रा लवकरच ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहे. सलमान खानच्या ‘बिग बॉस 10’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये लोपामुद्राचा समावेश आहे. बिग बॉसच्या घरात एंट्री करण्यापूर्वी लोपामुद्राने सीएनएक्सशी संवाद साधला. तिच्याशी मारलेल्या गप्पा, तिच्याच शब्दांत...
तुझ्या मॉडेलिंगची सुरुवात कशी झाली?
ज्या दिवशी ‘मिस इंडिया’साठी आॅडिशन होते, त्याच दिवशी माझी परीक्षा होती. मी परीक्षा हॉलमध्ये पोहोचले खरे; पण पेपर न देता आॅडिशनला जाण्याचा निर्णय घेतला. ‘मला अभियंता व्हायचे नाही आहे. माझे जग वेगळेच आहे,’ याचा साक्षात्कार जणू मला त्याक्षणाला झाला. अर्थात, माझ्या या निर्णयाला घरातून विरोध झाला. मला मार्गदर्शन करायला कुणीही नव्हते. लहान शहरांतील मुली ‘फॅशन’ जगतात टिकूच शकत नाही, असा समज होता; पण मी तो मोडून काढला आहे. लहान शहरांमधील तरुणींमध्येही प्रचंड क्षमता आहे, हे मी सिद्ध केले.
तुला घरातून विरोध झाला, असे तू म्हणालीस. हा विरोध आत्ताही कायम आहे का?
नाही, आता तसले काहीच राहिलेले नाही. मी मॉडेलिंग करावे, ही माझी निवड होती. घरातून विरोध होणार, याची थोडीफार जाणीव होतीच. मात्र, हा विरोध लवकरच मावळला. मी मिळविलेल्या यशाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर सर्व सुरळीत झाले. नागपूरकरांनी मला खूप साथ दिली. यामुळे मी नागपूरकरांची नेहमीच आभारी राहीन.
विविध सौंदर्य स्पर्धांत तू सहभागी झालीस. हा अनुभव कसा होता?
माझी पहिली स्पर्धा मिस इंडिया होती. मी नवीन होते; शिवाय मार्गदर्शन करणारे कुणीच नव्हते. सुमारे २२ स्पर्धकांना मागे टाकून मी अंतिम तीन स्पर्धकांत स्थान मिळविले. यानंतर अनेक स्पर्धांत सहभागी झाले. मिस इंडिया गोवा या स्पर्धेचे विजेतपद मिळविले. ‘यामाहा फॅसिनो कॅलेंडर गर्ल’ म्हणून माझी निवड झाली. या सर्व स्पर्धांत लोपामुद्रा असाच माझ्या नावाचा उल्लेख झाला; पण इक्वाडोरमध्ये झालेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेन्टल या स्पर्धेत सहभागी झाल्यावर मला ‘मिस इंडिया’ नावाने हाक मारली गेली, तेव्हा स्वत:चा अभिमान वाटला.
सौंदर्य स्पर्धांत सहभागी होताना तुझ्या मनात काय असायचे?
मिस युनायटेड कॉन्टिनेन्टलमध्ये सहभागी झाल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृतीची ओळख जपण्यावर
मी भर दिला. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतरदेखील दडपण होतेच; परंतु आत्मविश्वासच माझ्या कामी आला. कोणताही न्यूनगंड न बाळगता समोर जायलाच हवे. स्वत:तील काही त्रुटी दूर सारून स्वप्नांचा ध्यास घ्यायला हवा.
‘बिग बॉस’च्या घरात जाताना काही दडपण जाणवत आहे का?
घरात बसून राहणे मला कधीच जमले नाही. कॉलेजपासूनच मी लोकांसमोर परफार्म करीत आलेय. मला लोकांत मिसळून राहायला आवडते. आता बिग बॉसच्या घरात राहणे, म्हणजे जगाशी संपर्क तुटणार; पण तरी कुणीतरी आपल्यावर वॉच ठेवून आहे, याची जाणीव मनात ठेवायची आहे. आपले विचार लोकांसमोर मांडण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, असे मला वाटू लागले आहे. शिवाय, माझी सलमान खानला भेटण्याची
इच्छादेखील पूर्ण होणार आहे. ही भेट नुसतीच भेट नसेल, तर त्याच्याकडून बरेच काही शिकताही येईल.
सौदर्य स्पर्धांनंतर थेट ‘बिग बॉस’च्या घरात शिरताना तुझ्या मनात काय चालले आहे?
मी आतापर्यंत केवळ सौंदर्य स्पर्धांत सहभागी झाले आहे. अर्थातच, हे माझ्यासाठी नवीन आहे. मी कधी बिग बॉसची स्पर्धक असेन, असे मला वाटले नव्हते. काही वर्षांपूर्वी माज्या मैत्रिणीने ‘तू बिग बॉसमध्ये सहभागी होशील का?’ असा प्रश्न विचारला होता. आज मला तिची आठवण होत आहे. ही माझ्यासाठी मोठी परीक्षा आहे. इक्वाडोरमधून भारतात परतल्यावर मी बिग बॉसच्या अधिकाऱ्यांना भेटले. तेव्हापासून आतापर्यंत ही उत्सुकता कायम आहे.