टीव्हीवरील तारे मोठ्या पडद्यावर

By Admin | Published: February 17, 2016 02:02 AM2016-02-17T02:02:08+5:302016-02-17T02:02:08+5:30

टीव्हीवरील मालिकांमधून विविध भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या मनात नकळतपणे स्वत:च्या कॅरेक्टरची अनोखी छाप सोडून जातात. मालिकेमधील एखाद्या कलाकाराची भूमिका एवढी प्रसिद्ध ठरते की

The big stars of the TV stars | टीव्हीवरील तारे मोठ्या पडद्यावर

टीव्हीवरील तारे मोठ्या पडद्यावर

googlenewsNext

टीव्हीवरील मालिकांमधून विविध भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या मनात नकळतपणे स्वत:च्या कॅरेक्टरची अनोखी छाप सोडून जातात. मालिकेमधील एखाद्या कलाकाराची भूमिका एवढी प्रसिद्ध ठरते की, त्याच नावाने त्याला प्रेक्षक ओळखू लागतात, तीच त्यांची खरी ओळख होऊन जाते. मालिकेतील कलाकारांना रसिकांचे मिळणारे प्रेम इतके असते की, प्रेक्षक त्यांना नाटक, सिनेमा अशा कोणत्याही माध्यमात पाहायला उत्सुक असतात. त्यामुळेच, मालिकांमधून घराघरांत पोहोचणारे कलाकार आता आपल्याला मोठ्या पडद्यावरदेखील पाहायला मिळत आहेत.स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अभिजित खांडकेकर, मृणाल दुसानीस, शशांक केतकर, प्राजक्ता माळी, वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहेरे, सुयश टिळक, मृण्मयी देशपांडे अशा कितीतरी कलाकारांनी मालिकांनंतर आपला मोर्चा थेट चित्रपटांकडे वळवला. शशांक केतकरची नुकतीच एक मालिका संपली असली, तरी घराघरांत अजूनही ‘श्री’ नावानेच त्याची ओळख कायम आहे. आता तो मोठ्या पडद्यावर ‘वन-वे टिकीट’ या चित्रपटातून एन्ट्री करीत आहे.
सचित पाटील, अमृता खानविलकर अशा स्टार कास्टसोबत शशांक लवकरच त्याच्या चाहत्यांना बिग स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून विक्रम गोखले, मोहन जोशी, अविनाश नारकर, शरद पोंक्षे या दिग्गज कलाकारांसह सिद्धार्थ चांदेकरने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याला ‘झेंडा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली; तसेच बालगंधर्व, लग्न पाहावे करून, आॅनलाइन बिनलाइन, बावरे प्रेम हे, संशयकल्लोळ आणि क्लासमेट्स अशा चित्रपटांतून तो मोठ्या पडद्यावर झळकला. ‘अग्निहोत्र’ या त्याच्या पहिल्या मालिकेत स्पृहा जोशीच्या भावाचा रोल केल्यानंतर, आता त्याच्या आगामी चित्रपटात तो स्पृहाच्या हीरोची भूमिका बजावत आहे. वैभव तत्त्ववादीने २०१० मध्ये ‘डिस्कवर महाराष्ट्र’ या टीव्ही प्रोग्रॅममधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. त्यानंतर त्याने तुझं माझं जमेना, पिंजरा या मालिकांमध्ये काम केले. फक्त लढ म्हणा, सुराज्य, कॉफी आणि बरंच काही, अशा चित्रपटांतून त्याने मोठ्या पडद्यावर ठसा उमटविला. एवढेच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील ‘हंटर’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांतून त्याने पाऊल ठेवले आहे.
स्पृहा जोशीने तर मालिकांमधूनच तिच्या करिअरची सुरुवात केली होती. चाइल्ड आर्टीस्ट म्हणून अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर तिने छोट्या पडद्यावरच अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका या मालिकांमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. उंच माझा झोकाने, तर तिला रमाबाई रानडे अशीच नवी ओळख घराघरात मिळाली; तसेच पेइंग घोस्ट, मोरया, बायस्कोप या चित्रपटांतूनदेखील तिने सशक्त भूमिका साकारल्या.
‘अमर प्रेम’ या मालिकेतून सुयश टिळकने करिअरचा श्रीगणेशा केला. त्यानंतर त्याने टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. मोठ्या पडद्यावर त्याला अभिनेता म्हणून प्रमुख भूमिका करायला मिळाली नसली, तरी त्याने दर्जेदार रोल चित्रपटांमध्ये केले आहेत. कॉफी आणि बरंच काही, क्लासमेट्स या चित्रपटांतून त्याने चांगले रोल्स केले आहेत. अभिजित खांडकेकर, मृणाल दुसानीस, चिन्मय मांडलेकर, गौरी नलावडे, गायत्री सोहम, प्रिया मराठे या कलाकारांनी देखील छोटा पडदा गाजविल्यानंतर चित्रपटांमध्ये सशक्त भूमिका साकारल्या आहेत. एवढेच नाही, तर स्वप्निल जोशी, प्रिया बापट, संतोष जुवेकर, मुक्ता बर्वे, मनवा नाईक, हे कलाकार चित्रपट आणि मालिका अशा दोन्ही धुरा सांभाळत आहेत.

Web Title: The big stars of the TV stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.