बिग बॉस बनतोय बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा राजमार्ग
By Admin | Published: February 1, 2017 03:09 AM2017-02-01T03:09:58+5:302017-02-01T03:09:58+5:30
‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे आतापर्यंत दहा पर्व झाले तरीसुद्धा शोच्या लोकप्रियतेमध्ये घट झालेली नाही. तीन महिने एका घरात राहून चोवीस तास कॅमेऱ्याच्या निगराणीखाली
- Mayur Deokar
‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे आतापर्यंत दहा पर्व झाले तरीसुद्धा शोच्या लोकप्रियतेमध्ये घट झालेली नाही. तीन महिने एका घरात राहून चोवीस तास कॅमेऱ्याच्या निगराणीखाली वावरणे सोपी गोष्ट नाही. आपल्या आवडत्या सिलेब्रिटींचे खरे रूप काय हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतात. मागच्या काही सीझन्सचा विचार करता असे दिसून येते, की बिग बॉस आता केवळ बक्षीस जिंकण्याची स्पर्धा नाही तर मनोरंजन विश्वात एंट्री करण्याचा राजमार्ग आहे. यंदाच्या सीझनचे वैशिष्ट्य म्हणजे या वेळी कोणी सिलेब्रिटी नाही, तर सामान्य लोक बिग बॉसच्या घरात वास्तव्याला होते. शोमध्ये येण्यापूर्वी कोणाला माहीत नसलेले हे सर्व जण आता सिलेब्रिटी झाले आहेत. विजेता मनवीर गुर्जरला आता अनेक आॅफर्स मिळतील त्याच्यासाठी बॉलिवूडची दारे उघडतील यात शंका नाही. वादग्रस्त शो ते इंडस्ट्रीत लाँच होण्याचे सर्वात मोठे व्यासपीठ अशा बदललेल्या ओळखीसाठी कारणीभूत सिलेब्रिटींचा घेतलेला हा आढावा...
सनी लिओनी ‘बिग बॉस’मधून
आलेली ही सर्वांत मोठी सिलेब्रिटी आहे. शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी भारतात कोणालाच माहीत नसलेली सनी आज घराघरांत पोहोचलेली आहे. सनी आज बॉलिवूडमध्ये यशस्वी अॅक्ट्रेस बनलेली आहे. अनेक चित्रपट, जाहिराती आणि आयटम साँग्समधून ती झळकलेली आहे. सध्या तिचे ‘लैला मैं लैला’ हे गाणे खूप गाजत आहे.
सना खान
काही वादग्रस्त जाहिरातींमधून झळकलेल्या सना खानला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘बिग बॉस’च्या घरात आल्यावरच. सहाव्या पर्वात सहभागी झालेल्या सनाने शोनंतर सलमान खानच्या ‘जय हो’ सिनेमात काम मिळवून तिच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्या वेळी ती म्हणाली होती की, ‘हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी बिग बॉसपेक्षा चांगले आणि मोठे व्यासपीठ मला मिळूच शकले नसते.’
डॉली बिंद्रा
बिग बॉसमधील कदाचित सर्वांत वादग्रस्त स्पर्धक म्हणजे डॉली बिंद्रा. पाकिस्तानी स्टार डॉली शोमधील तिच्या असभ्य व अर्वाच्च भाषेमुळे प्रकाशझोतात आली. शोमधील प्रत्येकाशी पंगा घेतलेल्या डॉलीने शोनंतर अनेक चित्रपट आणि काही टीव्ही
शोमधून काम केले. अशीदेखील माहिती आहे की, या छोट्या पडद्यावरील एका शोमध्ये काम करण्यासाठी तिने एक कोटी रुपये घेतले होते.
एजाज खान
वाईल्ड कार्ड एंट्रीने बिग बॉसच्या सातव्या पर्वात आलेला एजाज सेकंड रनर-अप ठरला होता. ‘रक्तचरित्र’ व ‘अल्लाह के बंदे’ यासारख्या सिनेमांत काम केल्यानंतर त्याने ‘रहे तेरा आशीर्वाद’ व ‘कहाणी हमारे मोहब्बत की’ यासारख्या काही टीव्ही सिरीयल्स आणि कपिल
शर्मासोबत एक कॉमेडी शोमध्ये काम केले. अरमान कोहलीसोबतच्या भांडणांमुळे तो चर्चेत आला होता.
संतोष शुक्ला
‘बिग बॉस ६’द्वारे लाईमलाईटमध्ये आलेल्या संतोष शुक्लाने थेट सलमान खानच्या चित्रपटात झळकण्याची कमाल केली. ‘जय हो’मध्ये तो दिसला होता. त्यासोबतच ‘कहाणी चंद्रकांता की’ आणि ‘अदालत’ अशा सिरीयल्समध्येसुद्धा त्याने काम केलेले आहे.
सुशांत दिवगीकर
मॉडेल, अॅक्टर, व्हिडिओ जॉकी असणाऱ्या सुशांतच्या मनोरंजनविश्वातील करिअरला बिग बॉसमुळे खऱ्या अर्थाने उभारी मिळाली. आज तो एक सक्सेसफुल अँकर म्हणून ओळखला जातो. ‘बिग बॉस’च्या आठव्या सीझनद्वारे तो नावारूपाला आणि सर्वपरिचित सिलेब्रिटी बनला. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा व इव्हेंट्समध्ये त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
उपेन पटेल
उपेन पटेल एक उत्तम मॉडेल म्हणून ओळखला जातो. अनेक बॉलिवूड सिनेमांतून झळकल्यानंतरही तो इंडस्ट्रीमध्ये स्थैर्य मिळवू शकला नव्हता. अखेर ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाल्यानंतर प्रेक्षकांच्या नजरेत भरला. त्यानंतर तो उपेन पटेल हे नाव सर्वांच्या परिचयाचे बनले.