Bigg Boss Marathi 4: योगेश भाऊ, पुन्हा बाप काढला ना तर...., महेश मांजरेकरांनी झाप झाप झापलं...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 12:37 PM2022-10-23T12:37:33+5:302022-10-23T12:38:23+5:30
Bigg Boss Marathi 4 Weekend Chavadi: गेल्या आठवड्यात घरातील स्पर्धकांनी जोरदार राडा घातला. मग काय शनिवारी महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) काही जणांची जबरदस्त शाळा घेतली.
‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4 ) सध्या चांगलाच रंगतो आहे. घरातील तिसरा आठवडा संपला असून हळूहळू स्पर्धकांचे खरे चेहरे सगळ्यांसमोर येऊ लागले आहेत. घरात रोज नवे वाद, राडे पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात घरातील स्पर्धकांनी जोरदार राडा घातला. मग काय शनिवारी महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) काही जणांची जबरदस्त शाळा घेतली. अगदी कडक शब्दांत त्यांनी काही सदस्यांना समज दिली. योगेश, किरण माने हे दोन सदस्य मांजरेकरांच्या रडावर आलेत.
तिसऱ्या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये स्पर्धकांनी एकमेकांवर अटॅक करत टास्क पूर्ण केला. यादरम्यान स्पर्धकांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या. अगदी एकमेकांचा बाप काढायलाही स्पर्धकांनी मागेपुढे पाहिलं नाही. कॅप्टनसी कार्यात मेघा आणि योगेशचा वाद शिगेला पोहोचला. योगेशचा राग इतका अनावर झालेला दिसला की, घर दणाणून उठले. त्याने रागाच्या भरात घरातील मालमत्तेचं नुकसान केलं. मग काय महेश मांजरेकरांनी योगेशचे चांगलेच कान टोचले.
आधी मांजरेकर यांनी योगेशला उकसवल्याबद्दल त्रिशुलला फैलावर घेतलं. पण अचानक ते योगेशकडे वळले.‘ योगेश भाऊ याच्यानंतर तुम्ही बाप काढलेला कळलं मला तर त्याचवेळला बॅग भरून घराबाहेर काढेल,’ अशा शब्दांत त्यांनी योगेशला सुनावलं.
माने तू इश्शू केलास...
मागच्या आठवड्यात किरण माने आणि अमृता धोंगडे यांच्यातही जोरदार बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.किरण आणि विकास बाथरूममधील मोकळ्या जागेत बोलत असताना अमृता त्यांना म्हणते, ‘किरण दादा आणि विकास तुम्ही तुमचे प्लॅन बाथरूममध्ये ठरवत जाऊ नका. घरातल्या मुली बाथरूम वापरतात आणि बाथरूममधून बाहेर येताच समोर तुम्हाला पाहून त्यांना अस्वस्थ वाटतं. मुली बाहेर येऊन आपले कपडे ठीक करतात आणि अशा गोष्टी तुमच्या समोर करताना त्यांना विचित्र वाटतं. बाथरूमच्या बाहेरही खूप मोठी जागा आहे आणि हे ठिकाण बसण्यासाठी योग्य नाहीये.’ यावरून किरण माने प्रचंड भडलेले दिसले. यावरून मांजरेकरांनी मानेंनाही सुनावलं. अमृता काहीही एवढं मोठं चुकीचं बोलली नव्हती. माने तुम्ही त्याचा उगाच इश्शू केला. तुम्ही तो अगदी उगाळत बसलात, असं मांजरेकर म्हणाले.