'बिग बॉस मराठी'मध्ये मोठा ट्विस्ट! अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये, कोण जाणार घराबाहेर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 15:35 IST2024-09-22T15:35:02+5:302024-09-22T15:35:26+5:30
घराबाहेर जाण्याच्या टास्कमध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले होते. यापैकी एका सदस्याचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास आज संपणार आहे. पण, अशातच आता बिग बॉसने मोठा ट्विस्ट आणला आहे.

'बिग बॉस मराठी'मध्ये मोठा ट्विस्ट! अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये, कोण जाणार घराबाहेर?
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा खेळ दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. घरात टिकून राहण्यासाठी सदस्य रोज नवीन रणनीती आखताना दिसत आहेत. पण, आता वेळ आली आहे ती या आठवड्यातील एलिमिनेशनची...या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या टास्कमध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले होते. यापैकी एका सदस्याचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास आज संपणार आहे. पण, अशातच आता बिग बॉसने मोठा ट्विस्ट आणला आहे.
बिग बॉसच्या घरातील एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नॉमिनेट असलेले सदस्य दिसत आहे. निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज आणि वर्षाताई यांच्यासमोर त्यांच्या नावाची एक सुटकेस ठेवण्यात आली आहे. या सुटकेसमध्ये सदस्यांचं घरातील भवितव्य लॉक करण्यात आलं आहे. या सूटकेसमुळे सदस्य सेफ आहे की अनसेफ हे कळणार आहे. जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे या आठवड्यासाठी सेफ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये आहेत.
आता अरबाज आणि निक्कीपैकी एकाचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपणार आहे. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार, हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. पण, त्याबरोबरच चाहते संभ्रमातदेखील आहेत. अरबाज आणि निक्की हे बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहरे असून पहिल्या दिवसापासूनच त्यांच्याकडे स्ट्राँग स्पर्धक म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळेच त्या दोघांना डेंजर झोनमध्ये पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. बिग बॉसच्या या ट्विस्टमुळे यंदाचा भाऊचा धक्का आणखीनच खास होणार आहे. दरम्यान, या आठवड्यात हाताला दुखापत झाल्याने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेल्या संग्राम चौगुलेने शनिवारी घराचा निरोप घेतला आहे.