किरण मानेंची आता राजकारणात एन्ट्री! हाती बांधलं ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 02:11 PM2024-01-07T14:11:45+5:302024-01-07T14:13:49+5:30
'बिग बॉस मराठी' फेम किरण मानेंच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
'बिग बॉस मराठी' फेम किरण माने मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. अनेक मालिका आणि नाटकांत काम करून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. कलाविश्व गाजवल्यानंतर आता किरण मानेंनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत किरण मानेंनी शिवसेना(ठाकरे गट) प्रवेश केला. मानेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यावर किरण माने म्हणाले, "शिवसेना सामान्य माणसाला कुठून कुठे नेऊन ठेवते, हे खरंच आहे. मी एक सामान्य घरातील माणूस, एक कलाकार आहे. अनेकांना माझ्या या भूमिकेचं आश्चर्य वाटलं असेल, कित्येकांच्या मनात शंका असेल. मी एकच सांगतो की मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो, आहे आणि कायम राहीन. शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मी मांडत राहिलो. आता अचानक ही राजकीय भूमिका का घेतली? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण, आजच्या परिस्थितीत वातावरण गढूळ झालेलं असताना, संविधान वाचवण्यासाठी एकमेव माणूस लढत आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हा निर्णय मी विचारपूर्वक घेतलेला आहे. संवेदनशील कलाकार आणि भारताचा नागरिक म्हणून मी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना जी काही जबाबदारी देईल ती मनापासून पार पाडेन."
दरम्यान, किरण मानेंनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'मुलगी झाली हो', 'सिंधुताई माझी माय' या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी सिनेमांतही ते विविधांगी भूमिका साकारताना दिसले. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर ते अनेकदा स्पष्टपणे मत मांडताना दिसतात.