'जे झालं ते चांगलंच झालं'; स्नेहासोबतच्या नात्यावर आविष्कार पहिल्यांदाच व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 17:45 IST2021-10-26T17:45:00+5:302021-10-26T17:45:00+5:30
Avishkar darvekar: स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोपही केले होते. ज्यामुळे अविष्कारला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. परंतु, अलिकडेच अविष्कारने या सगळ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

'जे झालं ते चांगलंच झालं'; स्नेहासोबतच्या नात्यावर आविष्कार पहिल्यांदाच व्यक्त
छोट्या पडद्यावर अलिकडेच बिग बॉस मराठीचं (bigg boss marathi) तिसरं पर्व सुरु झालं. हे पर्व विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. कधी घरात रंगणाऱ्या टास्कवरुन तर कधी घरात वाहणाऱ्या प्रेमाच्या वाऱ्यावरुन. या सगळ्यात एक चर्चा सर्वाधिक रंगली ती म्हणजे स्नेहा वाघ आणि अविष्कार दारव्हेकर (sneha wagh and avishkar darvekar) यांच्या घटस्फोटाची. या शोच्या निमित्ताने ही जोडी कित्येक वर्षांनंतर एकमेकांच्या समोरासमोर आली. त्यामुळे हा शो सुरु झाल्यापासून त्यांच्या लग्नाची आणि घटस्फोटाची चर्चा रंहल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर स्नेहाने अविष्कारसोबतच्या नात्यावर अनेकदा तिचं मत मांडलं. यावेळी तिने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोपही केले. ज्यामुळे अविष्कारला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. परंतु, अलिकडेच अविष्कारने या सगळ्या चर्चांवर आणि खासकरुन त्याच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
अलिकडेच अविष्कारने 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत स्नेहासोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे. यावेळी 'जे झालं ते चांगलंच झालं. वर देवानेच ते ठरवून दिलं होतं आणि त्यानुसार झालं हे माझ्या भल्याचं ठरलं', असं त्याने म्हटलं आहे.
"माझ्या मनात माझ्या पहिल्या पत्नीविषयी कोणताच वाईट हेतू नाही. आतापर्यंत तिने करिअरमध्ये जे काही केलं ते तिच्या हिमतीवर केलं. तिचं करिअर तिने घडवलं आहे. यात माझ्या नावाचा वापर तिने कुठेच केला नाही. आणि,या गोष्टीचा मला अभिमानसुद्धा वाटतो. लोकांना हे कळत नाही की लग्नात कायम दोन व्यक्ती असतात. एकटं कोणीच नसतं. त्यामुळे जे होतं ते दोघांमुळे होतं," असं अविष्कार म्हणाला.
पुढे तो म्हणतो,"त्यावेळी मला एकटं पडल्यासारखं झालं होतं. पण काळ पुढे जात राहिला. हा. थोडं सहन करावं लागलं पण आता सगळं चांगलं आहे. आता मुळात ते का झालं? कशामुळे झालं? हे सारं सगळ्यांसमोर आलेलं आहे. त्यामुळे त्याविषयी मी वेगळ काही सांगायची गरज नाही.पण जे झालं ते माझ्या भल्यासाठी, चांगल्यासाठी झालं. त्यामुळे मी माझ्या कामावर नीट लक्ष देऊ शकलो. जे झालं ते देवाने घडवून आणलं आणि ते चांगलंच झालं."
दरम्यान, बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघ आणि अविष्कार दारव्हेकर यांना एकत्र पाहिल्यावर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेला उधाण आलं होतं. या दोघांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यात स्नेहाच्या काही जुन्या मुलाखतींचाही समावेश होता. विशेष म्हणजे स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. अविष्कारसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यावर तिने दुसरं लग्न केलं. मात्र, तिचा दुसरा संसारही फार काळ टिकला नाही.