"मुली सुरक्षित नाहीत, महाराज असते तर...", 'बिग बॉस मराठी' फेम विशाल निकम स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 09:55 AM2024-02-20T09:55:52+5:302024-02-20T09:56:34+5:30
'शिवबाचं नाव' गाण्याच्या निमित्ताने विशालने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. यातीलच एका मुलाखतीत त्याने "आज शिवाजी महाराज असते तर..." यावर भाष्य केलं.
'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विशाल निकम. अभिनयाबरोबरच विशाल त्याची पीळदार शरीरयष्टी आणि फॅशनसाठी ओळखला जातो. विशालने अनेक मालिकांमध्ये काम करून अभिनयाचा ठसा उमटवला. शिवजयंतीनिमित्त प्रदर्शित झालेल्या 'शिवबाचं नाव' या गाण्यात विशाल झळकला. या गाण्यात विशाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला.
'शिवबाचं नाव' गाण्याच्या निमित्ताने विशालने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. यातीलच एका मुलाखतीत त्याने "आज शिवाजी महाराज असते तर..." यावर भाष्य केलं. "आज महाराज असते तर ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असती. ही काळाची गरज आहे, असं मला वाटतं. कुठेतरी मला वाटतं की अजूनही मुली तितक्या सुरक्षित नाहीत. किंवा काही जण मुलींचा आदर करणं विसरले आहेत. आज महाराज असते तर त्यांना तिथल्या तिथे शिक्षा मिळाली असती. त्यांच्यावर कारवाई झाली असती. आता आपली कायदेशीर प्रक्रियासुद्धा खूप लांबलचक झाली आहे. त्यामुळे लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही. नशेत आणि व्यसनात लोक गुंग होतात. त्यांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. महाराज असते तर भीती निर्माण करणारं शासन असतं. मुली सक्षम होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, जर महाराज असते तर अशा लोकांना स्वराज्यात थारा मिळाला नसता. सगळ्या गोष्टी मिटल्या असता," असं विशाल मीडिया टॉक मराठी या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
"समाजातील काही लोक चांगलं कामही करत आहेत. मर्दानी खेळ शिकवले जात आहेत. ह्या गोष्टी सुरू राहिल्या हव्यात. प्रत्येकाने या गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यावेळी सुद्धा मुघलांसारखे शत्रू होते. आता जर तसे शत्रू समाजात असतील त्यांना धडा शिकवण्याची हिंमत प्रत्येकात असली पाहिजे," असंही तो पुढे म्हणाला. दरम्यान, विशाल 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. आता तो लवकरच ऐतिहासिक मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.