"तुम्ही तुमच्या स्टाईलनं धुमडी उडवा..." मराठी अभिनेत्याची सूरज, धनंजय आणि घन:श्यामसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 01:36 PM2024-08-02T13:36:35+5:302024-08-02T13:42:10+5:30
मराठी मनोरंजनाचा बॉस असलेल्या या शोप्रमाणे त्यातील स्पर्धकही चर्चेचा विषय ठरत आहेत.
Bigg Boss Season 5 Kiran Mane Post : यंदाच्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस असलेल्या या शोप्रमाणे त्यातील स्पर्धकही चर्चेचा विषय ठरत आहेत. या नव्या पर्वाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, या पर्वामध्ये मालिका तसेच सिनेसृष्टीतील कलाकारांसह गायन, रिल स्टार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांसारखी मंडळी पाहायला मिळते आहे. पण, सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर तसेच रिल स्टार यांना बिग बॉसच्या घरात पाहून अनेकांनी ट्रोलही केलं. तर काहींनी त्यांना पाठिंबाही दिला. यासोबतच सोशल मीडियावर नेटकऱ्यांसह काही कलाकार मंडळीही आपल्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करताना दिसत आहेत. मराठी अभिनेता किरण मानेंनी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेते किरण माने त्यांच्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर ते आपली मते तसेच भूमिका रोखठोकपणे मांडत असतात. नुकतीच त्यांनी स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर बिग बॉस मराठी पर्व पाचमधील काही स्पर्धकांच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी स्पर्धक सूरज चव्हाण, धनंजय पोवर आणि घन: श्याम दरोडे यांना पाठिंबा दर्शवला आहे.
या पोस्टमध्ये किरण मानेंनी लिहलंय, "हे कसेही खेळले, समजा मुर्खपणा केला, तरी माझं प्रेम आणि सपोर्ट या तिघांना राहाणार. तिघं गावच्या मातीतली आहेत आणि दुसरं म्हणजे शहरी 'सो कॉल्ड' सभ्य-असभ्यता, संस्कृती-फिंस्कृती, शुद्ध-अशुद्धता उंच कोलून, रिअल वागून लोकप्रिय होऊन इथवर पोहोचलेली आहेत. इथेही ते जे काहीही कसेही वागतील ते 'रिअल' असणार. या सगळ्यांविषयी मला आदर आहे आणि त्यांना माझ्याविषयी. हे तिघे ही लै भारी आहेत. ते ज्या पद्धतीचे रील्स बनवतात, ते मला कधीच जमणार नाही. आपली इच्छा नाही आणि लायकीही नाही.मी ठामपणे सांगतो, मी जे अभिनयात, परिवर्तन चळवळीत आणि राजकारणात एकाचवेळी जे काही करतोय तोही त्यांच्या सोडाच, मनोरंजन इंडस्ट्रीत नव्याजुन्या कुणाच्याच तोंडचा घास नाही, दम नाही. फरक असतो.कुणाला गंमतजंमत करणारी रील्स करून फॉलोअर्स मिळतात, तर कुणाला विवेकी विचारसरणी मांडून आणि अभिनय करुन. खोटं वागणार्या आणि माकडचाळे करणार्यांचं बिग बॉसमध्ये माकड होतं. हे चार वर्षांपुर्वी माझं मत होतं. पुर्वी मी बिग बॉसच्या सिझन दोनची ऑफर नाकारली होती, हा त्याचा सणसणीत पुरावा! बाकी धुणीभांडी करण्याला मी कमीपणाचं मानत नाही. 'बायकांची कामे' मानून अशा कामांना हिणवणारे बुळगे नामर्द असतात.असो.सिझन चार स्विकारला कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती.मी मोदीवर टीका करणारी पोस्ट केली. भक्तडुक्कर पिलावळीनं उच्छाद मांडला. मला सिरीयलमधुन काढून टाकलं गेलं.आज मी जिद्दीनं पायऱ्या चढत शत्रूंची थोबाडं ठेचत प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचं वलय कितीतरी पटींनी वाढवलं. यासाठी माझ्या चाहत्यांसमोर मी नम्रच आहे. याचबरोबर बिग बॉस माझ्यासाठी गॉडफादर ठरलं. इथं माकड केलं जात नाही. बिग बॉस वाघाला वाघ म्हणूनच दाखवतो आणि माकडाला माकड".
पोस्टमध्ये पुढे त्यांनी म्हटलंय, "विशेषत: ग्रामीण भागातली जनता पहिल्यांदा बिग बॉसकडे वळली आणि मला अभूतपुर्व प्रेम दिलं. माझ्याहून निम्म्या वयाच्या पोरांना धोबीपछाड देत थेट टॉप थ्री पर्यन्त मजल मारू शकलो ते यामुळेच.गांवोगांवी मिरवणुका निघाल्या. 'बिग बॉस पब्लिक विनर किरण माने' अशा रांगोळ्या काढल्या गेल्या. बिग बॉसच्या घरातही मी रोज एक तुकाराम महाराजांचा अभंग अर्थासहित सांगणे. गौतम बुद्ध, छ. शिवराय, जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक गोष्टी सांगणे,या जगावेगळ्या गोष्टी केल्या. हे बिग बॉसमध्ये कधीच घडलं नव्हतं आणि खात्रीने सांगतो, यापुढेही हे घडणार नाही. असो, तर, डीपी, घन:श्याम आणि सूरज माझ्या मातीतल्या माझ्या बहुजन भावांनो, बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या स्टाईलने धुमडी उडवा. चिखलात धुरळा, पाण्यात आग लावा. पुंग्या टाईट करा एकेकाच्या. तुम्हा तिघांनाही लै लै प्रेम".