छोट्यांची मोठी एंट्री

By Admin | Published: August 6, 2015 12:25 AM2015-08-06T00:25:12+5:302015-08-06T09:00:58+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या बालकलाकारांची चर्चा आहे. ‘श्वास’पासून ते ‘टिंग्या’, ‘फॅँड्री’पर्यंत आणि ‘एलिझाबेथ एकादशी’पर्यंत बालकलाकारांनी स्वत:च्या ताकदीवर चित्रपट खेचून नेले. ‘शाळा’, ‘टाइमपास’मध्ये

Bigger entry of little ones | छोट्यांची मोठी एंट्री

छोट्यांची मोठी एंट्री

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या बालकलाकारांची चर्चा आहे. ‘श्वास’पासून ते ‘टिंग्या’, ‘फॅँड्री’पर्यंत आणि ‘एलिझाबेथ एकादशी’पर्यंत बालकलाकारांनी स्वत:च्या ताकदीवर चित्रपट खेचून नेले. ‘शाळा’, ‘टाइमपास’मध्ये पौगंडावस्थेतील प्रेमही दाखविले गेले. मराठी फिल्म इंडस्ट्रीत बालकलाकार म्हणून काम केलेल्या छोट्यांनी मोठी एंट्री घेतल्याचे उदाहरण आहे.
मराठी इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी स्वत:च्या कारकिर्दीला त्यांना काही कळायच्या आतच सुरुवात केली होती आणि ते आज प्रचंड नावारूपाला आले आहेत. तमाशापटात अडकलेल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला खऱ्या अर्थाने तरुण करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावण्यात सचिन आणि महेश कोठारे यांचे मोठे योगदान आहे. सचिन यांनी वयाच्या सातव्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटात काम केले होते. निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिका बजावत गेली पाच दशके ते मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवीत आहेत. राजेश खन्ना-शर्मिला टागोर-फिरोज खान यांच्या ‘सफर’मध्ये बालकलाकार म्हणून काम केलेले महेश कोठारेदेखील मराठी चित्रपटसृष्टी गाजवीत आहेत. महेश कोठारे यांच्या ‘माझा छकुला’मधील आदिनाथ आता नायकाच्या भूमिका करत आहे. ‘दे धमाल’मधील फ्रॉकमधील स्पृहा जोशी मराठी चित्रपट आणि नाटकांत गाजत आहे. ‘कवडसे’ चित्रपटातील सिद्धार्थ चांदेकर सध्या तरुणाईचा आवडता नायक आहे. ‘भेट’ या २००२ मध्ये आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटातील लहानगी प्रिया बापट सध्या मराठीतील फेवरेट हीरोइन आहे. ‘शटर’मध्ये रिक्षावाल्याच्या भूमिकेत धमाल उडविणाऱ्या अमेय वाघ यानेही अनेक नाटकांतून बालकलाकार म्हणून काम केले आहे. आता लहानपणीच अ‍ॅक्टिंग कोर्सेसमध्ये पाठवून मुलांना अभिनयक्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनयाला सुरुवात करणे जितके कठीण तितकेच एकदा एंट्री केली, की त्यात आपला ठसा उमटवणे हे महाकठीण. आदिनाथ, स्पृहा, सिद्धार्थ, प्रिया, अमेयसारख्या अनेक बालकलाकार मंडळींनी बालपणी केलेले काम आजच्या तरुणांच्या स्मरणात आहे. त्या काळी या बालकलाकारांचे असलेले फॅन्स आजही त्यांना फॉलो करत आहेत. आता प्रतीक्षा आहे, ती आजचे बालकलाकार म्हणजेच अश्विन चितळे, श्रीरंग महाजन, पुष्कर लोणारकर, मिहिरेश जोशी, पार्थ भालेराव, अर्चित देवधर यासारख्या बालकलाकारांनी भविष्यातही याच क्षेत्रात अभिनयाचा आलेख उंचावण्याची.
विद्याताई पटवर्धन हे बालरंगभूमीवरचं मोठं नाव. या पटवर्धनबाई माझ्या शाळेत होत्या. त्यांनी दुसरीमध्येच मला नाटकात काम करायला दिलं आणि नंतर ई-टीव्ही, अल्फा मराठीवरील ‘दे धमाल’ या मालिकेत काम करायची संधी दिली. मी या कामाकडे एक मजा म्हणून बघितलं आणि छंद म्हणून जोपासलं आणि मजा म्हणूनच अगदी कॉलेजमध्येही नाटकात काम केलं. गंमत म्हणजे, लहानपणापासून मी अभिनय करत असूनही कॉलेज झाल्यानंतर, याच क्षेत्रात करिअर क रायचं ठरवलं.
- स्पृहा जोशी, अभिनेत्री

Web Title: Bigger entry of little ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.