Birthday Special : कधी काळी रणवीर सिंगला वाटावा लागला चहा, आज आहे सुपरस्टार!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 09:27 AM2018-07-06T09:27:10+5:302018-07-06T09:29:35+5:30
बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा आज (६ जुलै) वाढदिवस. रणवीरने फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:ची एक ओळख निर्माण केली.
बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा आज (६ जुलै) वाढदिवस. रणवीरने फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:ची एक ओळख निर्माण केली.
तुम्हाला माहित नसेल पण रणवीरचे खरे नाव रणवीर सिंग भवनानी आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर त्याने भवनानी हे आडनाव आपल्या नावातून गाळले. खरे तर रणवीरला आपले रणवीर हे नावही बदलायचे होते. कारण त्याच्या व रणबीरच्या नावात बरेच साम्य वाटते. पण का कुणास ठाऊक नंतर रणवीरने आपला हा इरादा बदलला.
रणवीर सिंगचे बॉलिवूडशी कनेक्शन नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. होय, कारण रणवीर अनिल कपूरचा नातेवाईक आहे. रणवीरचे वडिल आणि अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर हे चुलत भाऊ-बहीण आहेत. अर्थात तरिही रणवीरला चित्रपटात येण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. शिवाय दीर्घ प्रतीक्षा करावी लागली.
तसा बॉलिवूडमध्ये येण्याचा रणवीरचा विचार नव्हता. खरे तर त्याला कंटेंट राईटर बनायचे होते. यासाठी अमेरिकेत तो शिकायलाही गेला. पण याठिकाणी पहिल्याच क्लासमध्ये रणवीरने ‘दीवार’चा डायलॉग बोलून दाखवला आणि त्यावेळी त्याचे प्रचंड कौतुक झाले. मुळात या एका घटनेनंतरच रणवीरने हिरो बनण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतून भारतात परतल्यावर त्याला ३ वर्षे संघर्ष करावा लागला. या काळात एका जाहिरात कंपनीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले. पण त्याला अभिनयात रस होता आणि हेच करायचे होते.
यानंतर रणवीरने थिएटरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. पण याठिकाणी त्याला पडद्यामागचे काम सोपवले गेले, कलाकारांना चहा वाटणे, खुर्च्या लावणे, तालमीची तयारी करणे, अशी कामे त्याला करावी लागलीत. पण रणवीरने धीर सोडला नाही.
आदित्य चोप्राने रणवीरला पहिला ब्रेक दिला. २०१० मध्ये ‘बँड बाजा बारात’मध्ये रणवीरची वर्णी लागली. हा पहिलाच चित्रपट हिट झाला आणि रणवीर स्टार झाला. या चित्रपटाआधीही रणवीरला तीन चित्रपट आॅफर झाले होते. पण रणवीरने स्वत: ते नाकारले होते.
यानंतर रणवीरने कधीच मागे वळून पाहिले नाही. पुढे भन्साळी कंपूत त्याची एन्ट्री झाली. ‘गोलियों की रासलीला रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यासारख्या सुपरहिट चित्रपटात तो दिसला. लवकरच रणवीर रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’मध्ये दिसणार आहे. कबीर खानच्या ‘१९८३ द फिल्म’ आणि ‘गली बॉयमध्ये’ही रणवीर आहे.