सलमान असा काही बोलला की, काजोलच्या वडिलांनी पुन्हा कधीच बनवला नाही सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 08:00 AM2020-12-27T08:00:00+5:302020-12-27T08:00:02+5:30
आज ‘दबंग खान’ सलमान खानचा आज वाढदिवस, वाचा पडद्यामागचा किस्सा
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचा आज वाढदिवस. आता भाईजानचा वाढदिवस म्हटल्यावर त्याच्या पर्सनल आयुष्यातील किस्सा आलाच. आज आम्ही एक असाच किस्सा सांगणार आहोत. तर किस्सा आहे सलमान खान आणि अभिनेत्री काजोलचे वडील शोमू मुखर्जी यांच्याबद्दलचा.
‘प्यार किया तो डरना क्या’ या सिनेमातील काजोल व सलमानची जोडी चाहत्यांना खूप भावली होती. याच सलमानने काजोलचे वडील शोमू मुखर्जी यांच्यासोबतही काम केले होते. शोमू मुखर्जी बॉलिवूडचे एक दिग्गज दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. 1994 साली शोमू यांनी ‘संगदिल सनम’ नावाचा एक सिनेमा बनवला होता. मात्र या सिनेमानंतर शोमू यांनी सिनेमा बनवणेच सोडून दिले. असे का तर याचे कारण आहे सलमान खान.
होय, ‘संगदिल सनम’ या सिनेमात सलमान खान व मनीषा कोईराला लीड रोलमध्ये होते. सिनेमा बनून तयार झाला आणि याचा प्रीमिअर शो ठेवला गेला. हिरो या नात्याने साहजिकच सलमान या प्रीमिअरला हजर होतो. सिनेमा संपला आणि सगळे बाहेर निघू लागले. सलमानही बाहेर आला. पण त्याचे मूड इतके खराब होते की, शोमू मुखर्जी दिसताच ‘आपने बहोत ही बकवास फिल्म बनाई है,’ असे त्याने त्यांना अगदी तोंडावर सुनावले.
सलमानचे हे वाक्य ऐकून शोमू यांचा पारा चढला. तरीही संयम राखत ते शांत राहिले. त्यावेळी सलमानचे ते शब्द त्यांना खोलवर दुखावून गेले. भरीस भर म्हणजे पुढे वर्षभर या सिनेमाला वितरकच मिळाला नाही. हा सिनेमा फ्लॉप झाला आणि सिनेमा फ्लॉप होण्याचे सगळे खापर सलमानच्या डोक्यावर फोडण्यात आले. कारण त्याकाळात सलमानचे बॅक टू बॅक सगळेच सिनेमे दणादण आपटत होते. मात्र यानंतर सलमान व माधुरी दीक्षितचा ‘हम आपके है कौन’ सुपरडुपर हिट झाला. ‘हम आपके है कौन’ सुपरहिट झालेला पाहून आपल्याच सिनेमात दोष होता, ही गोष्ट शोमू मुखर्जींना मनोमन पटली. यानंतर त्यांनी काय करावे तर सिनेमे बनवणेच सोडून दिले.