ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक मा.विनायकराव पटवर्धनांचा जन्मदिन

By Admin | Published: July 22, 2016 08:54 AM2016-07-22T08:54:24+5:302016-07-22T08:55:22+5:30

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक मा.विनायकराव पटवर्धन अथवा पटवर्धनबुवा यांचा आज (२२ जुलै) जन्मदिन.

Birthday of veteran singer Vinayakrao Patwardhan of Gwalior Gharana | ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक मा.विनायकराव पटवर्धनांचा जन्मदिन

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक मा.विनायकराव पटवर्धनांचा जन्मदिन

googlenewsNext
>संजीव वेलणकर
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ -  ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक मा.विनायकराव पटवर्धन अथवा पटवर्धनबुवा यांचा आज जन्मदिन. २२ जुलै १८९८ साली जन्मलेले मा.विनायकराव पटवर्धन हे पलुस्करांचे गायन गुरू होते. त्यांनी आपले काका केशवराव यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर मिरज संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर ते लाहोर येथे गेले व तिथे त्यांनी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्यत्व पत्करले. पलुसकर बुवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गाणे अधिक संपन्न झाले. त्यांनी मिरज येथे पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर व पुणे येथे रामकृष्णबुवा वझेयांचेकडेही काही वर्षे संगीताचा अभ्यास केला. पटवर्धनबुवांनी पुण्यात ८ मे १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यातील काही जण उत्कृष्ट गायक तर काही जण उत्तम शिक्षक बनले. त्यांच्या शिष्यांतील काही निवडक मंडळी म्हणजे पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर, पं. एस. बी. देशपांडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. विष्णू घाग व पं. व्ही. डी. घाटे हे होत. १९४२ मध्ये त्यांनी भारतीय संगीत प्रसारक मंडळ या ट्रस्टची स्थापना केली व गांधर्व महाविद्यालयाचे कामकाज ट्रस्टकडे सोपविले. ग्वाल्हेर शैलीच्या गायनाचे वैशिष्ट्य असलेल्या संगीत रागांना सहज सोप्या पद्धतीने गाण्याचा कल त्यांच्या गायनातून अधोरेखित होत असे.. विनायकराव हे त्यांच्या तराण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांची भजन गायनाची शैलीही निराळी होती. त्यांनी 'राग विज्ञान' (सात खंड), 'नाट्य संगीत प्रकाश' आणि 'महाराष्ट्र संगीत प्रकाश' ही पुस्तके लिहिली. त्यांनी जवळपास १० वर्षे अनेक मराठी संगीत नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रख्यात कलाकार बालगंधर्व यांच्या जोडीने ते रंगमंचावर वावरले. पटवर्धनबुवांच्या नेतृत्वाखालील भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ सोव्हियेत संघ, पोलंड वचेकोस्लोव्हाकिया या राष्ट्रांचा दौरा करून आले होते. विनायकरावांना १९६५ मध्ये संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली. १९७२ मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. मा.विनायकराव पटवर्धन यांचे २३ ऑगस्ट १९७५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.विनायकराव पटवर्धन यांना आदरांजली.

Web Title: Birthday of veteran singer Vinayakrao Patwardhan of Gwalior Gharana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.