'लोकांना धमक्या देण्याऐवजी अॅक्टिंगवर लक्ष द्या'; अर्जुन कपूरला भाजपा नेत्याचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 04:05 PM2022-08-18T16:05:13+5:302022-08-18T16:06:29+5:30
Narottam mishra: अलिकडेच अर्जुन कपूरने बॉयकॉट ट्रेंडवर त्याचं मत मांडलं होतं. मात्र, हे मत मांडत असताना त्याचा सूर धमकीवजा असल्याचं म्हटलं जात होतं. यामध्येच आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अर्जुनला खडे बोल सुनावले आहेत.
बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांवर सध्या बॉयकॉटचं (boycott) सावट असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'लाल सिंह चड्ढा' (lal singh chaddha) आणि 'रक्षाबंधन' (Raksha Bandhan) या दोन सिनेमांना बॉयकॉट करावं अशी मागणी सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहे. त्यामुळे या बॉयकॉटच्या मुद्द्यावर अनेक बॉलिवूड कलाकार भाष्य करत आहेत. यात अलिकडेच अभिनेता अर्जुन कपूरने (arjun kapoor) बॉयकॉट ट्रेंडवर त्याचं मत मांडलं. मात्र, हे मत मांडत असताना त्याचा सूर धमकीवजा असल्याचं म्हणत अनेकांनी त्याच्यावर टीकास्त्र डागलं. यामध्येच आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (narottam mishra) यांनी अर्जुनला खडे बोल सुनावले आहेत.
अर्जुनचं वक्तव्य ऐकल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. मात्र, नरोत्तम मिश्रा यांनी अर्जुनची कानउघडणी केली आहे. 'जनतेला धमकी देण्यापेक्षा स्वत: च्या अभिनयावर लक्ष दे', असं थेट त्यांनी सांगितलं आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले नरोत्तम मिश्रा ?
"आता एखादा फ्लॉप आणि चिंताग्रस्त अभिनेता जनतेला धमकी देत असेल तर ते योग्य नाही. जनतेला धमकी देण्यापेक्षा स्वत:च्या अभिनयावर लक्ष दिलं तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं," असं नरोत्तम मिश्रा म्हणाले.
फिल्म अभिनेता #ArjunKapoor का जनता को धमकाना ठीक बात नहीं है। जनता को धमकाने की जगह अपने अभिनय पर ध्यान देना चाहिए।
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) August 17, 2022
अपनी फिल्मों में हिंदू धर्म को टारगेट करने वाले टुकड़े-टुकड़े गैंग के हिमायती कलाकार बॉयकॉट पर क्यों जनता को धमकाते हैं? pic.twitter.com/STpxY94GVc
पुढे ते म्हणतात, "मला त्यांना एक प्रश्नही विचारायचा आहे. जे सध्या बाजू मांडत आहेत त्यांच्यापैकी एकामध्ये तरी हिंमत आहे का जे अन्य धर्मावर चित्रपट तयार करु शकतात वा त्या धर्माविरुद्ध अपशब्द काढू शकतात? त्या देवांना अपमानित करु शकतात? मग फक्त सनातनी लोकांसोबतच असं करुन वरुन बॉयकॉटच्या मुद्द्यावरुन जनतेला धमकावतात. जरा तुम्ही सुद्धा वाट पाहा अर्जुनजी. आताची जनता सुज्ञ झाली आहे."
काय म्हणाला होता अर्जुन?
अलिकडेच अर्जुनने ‘बॉलिवूड हंगामा’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडविषय़ी त्याचं मत मांडलं होतं. "आता संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला एकत्र येऊन याविरोधात लढा द्यावा लागणार. कारण हे दिवसागणिक वाढत चाललंय. आता ट्रोलर्सला उत्तर देण्याची वेळ आली आहे. इंडस्ट्रीतले आम्ही लोक शांत राहिलो, कदाचित इथेच आमचं चुकलं. आम्ही विनम्रता दाखवली आणि ट्रोलर्सने याचा फायदा घेतला. जे मनात येईल ते लोक बोलत आहेत. मला विचाराल तर आमचं काम बोलेल, आम्ही ट्रोलर्सच्या कमेंट्सवर रिअॅक्ट करून खालची पातळी का गाठायची, असं माझं मत होतं. पण आता अति झालं आहे. बॉलिवूडला बायकॉट करण्याचा ट्रेंड लोकांची सवय बनू लागली आहे. आम्हा सर्वांना एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. कारण लोक आमच्याबद्दल बोलत आहेत. हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. त्यांना रिअॅलिटीची काहीही देणंघेणं नाही. आम्ही एखादा सिनेमा करतो, तो बॉक्सऑफिसवर चालला तर लोक आम्हाला डोक्यावर घेतात. पण ते आमच्या आडनावामुळे नाही तर आमच्या कामामुळे. पण आता लोक ज्या पद्धतीने वागत आहेत ते अजिबात खपवून घेण्यासारखं नाही", असं अर्जुन म्हणाला होता.