'ही' आहे सलमानला तुरुंगात धाडणारी चौकडी; धमक्यांना घातली नाही भीक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 04:34 PM2018-04-06T16:34:55+5:302018-04-06T16:37:07+5:30
आम्ही शिकार केली नाही, किंबहुना काळविटांना बिस्किटे खायला दिली, हा सलमान खानचा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला.
मुंबई - 1998च्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरविलेल्या अभिनेता सलमान खानला आजची (मार्च 6) रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमान खानच्या जामिनावर आता उद्या (मार्च 7) सकाळी साडेदहाच्या सुमारास सुनावणी होणार आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने जामिनावरील निर्णय राखून ठेवला असून उद्या त्यावर सुनावणी केली जाईल. त्यामुळे सलमानचं आज तुरुंगात राहणं निश्चित आहे. तब्बल 19 वर्षानंतर कोर्टाने काल सलमान खानला शिक्षा सुनावली. सलमान खानला तुरुगांत धाडण्यामध्ये चार व्यक्तीचे मोठं योगदान आहे. यांना वारंवार धमक्या आल्या पण यांनी आशा धमक्यांना भीक न घलता सत्य समोर आणलं. पूनमचंद बिष्णोई , छोगाराम बिष्णोई, हरीश दुलानी आणि ललित बोरा आशी या चार चौकडीची नावे आहेत.
शिकार झालेल्या काळविटांचे पोस्टमॉर्टेम आणि पूनमचंद बिष्णोई व छोगाराम यांच्या साक्षी यांमुळे सलमानवरील आरोप सिद्ध करणे सोपे झाले. जिप्सीमध्ये काळविटांच्या रक्तांचे डाग असल्याचेही उघड झाले. या बाबींमुळे सलमानला शिक्षा झाली. आम्ही शिकार केली नाही, किंबहुना काळविटांना बिस्किटे खायला दिली, हा सलमान खानचा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला.
सलमानला गोळी झाडताना पाहिलं -
ज्या खटल्यांत बडी मंडळी आरोपी असतात, त्यातील साक्षीदार अचानक गायब होतात वा फुटतात, असे अनेकदा आढळून आले आहे. मात्र सलमानविरुद्धच्या खटल्यात पूनमचंद बिष्णोई व छोगाराम हे दोन साक्षीदार अखेरपर्यंत आपल्या साक्षीवर ठाम राहिले. हे सारे कलाकार रात्रीच जिप्सीमधून निघाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास पूनमचंद बिष्णोई लघुशंकेसाठी उठले असता, त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. कारचे दिवेही त्यांनी पाहिले. जिप्सीचे दिवे व गोळीबाराच्या आवाजामुळे त्यांनी शेजारी छोगाराम यांना जागे केले. ते दोघेही जिप्सीच्या मागे धावत गेले. जिप्सीमध्ये त्यांनी सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, नीलम व सोनाली बेंद्रे यांना पाहिले. या पाचही कलावंतांना पूनमचंद बिष्णोई यांनी लगेचच ओळखले. बिष्णोई यांनी आपल्या साक्षीत हा उल्लेख केला होता.
जिप्सीचा चालक -
सलमान खानने ज्या जिप्सीमधून काळवीटाची शिकार केली होती. त्या जिप्सीचा चालक हरीश दुलानी होता. हरीश दुलानीला पोलिसांनी त्याब्यात घेऊन विचारपूस सुरु केली त्यावेळी हरीशने पोलिसांना सांगितले, की सलमानने त्या रात्री काळवीट आणि चिंकाराची शिकार केली होती. हरीशच्या साक्षीमुळं सलमानचे पाय आणखी खोलात अडकले.
तपास आधिकारी ललित बोरा -
ललित बोरा यांच्याकडे सर्वात आधी सलमान खानची काळवीट शिकारप्रकरण आले होते. त्यांनी सलमानसह अन्य कलाकारंची कसून चौकशी केली होती. ललित बोरा त्यावेळी असिस्टेंट फॉरेस्ट रेंजरच्या पदावर होते. 3 ऑक्टोबर 1998 रोजी काही लोकांनी जोधपूर जिल्हा वन आधिकाऱ्याकडे काळवीट शिकारची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सात ऑक्टोबर रोजी या खटल्याची जबाबदारी ललित बोरा यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यावेळी बोरा यांनी सर्व पुरावे गोळा केले. जिप्सी चालक हरीश दुलानी याला पडकले त्याची कसून चौकशी केली. सर्व पुरावे हातात आल्यानंतर सलमानसह इतर कलाकारांना ताब्यात घेतलं. 2002 मध्ये बोरा यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. सध्या ते एका कंपनीमध्ये मॅनेजरच्या पदावर काम करत आहेत.