जन्म-जन्मांतरीच्या वचनपूर्तीची कन्फ्युज करणारी कहाणी, बॉबी देओल-दिशा पटानीच्या 'कंगुवा' सिनेमाचा रिव्ह्यू
By संजय घावरे | Published: November 14, 2024 05:51 PM2024-11-14T17:51:07+5:302024-11-14T17:52:46+5:30
एका अनोख्या नात्याभोवती गुंफण्यात आलेली कथा बरेच प्रश्न अनुत्तरीत ठेवून संपते. कारण या चित्रपटाचा पुढचा भागही येणार आहे. त्यात दिग्दर्शक सिवा पहिल्या भागातील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.
या चित्रपटाची कहाणी जरी जन्म-जन्मांतरीच्या वचनपूर्तीची असली तरी प्रेम कहाणी मुळीच नाही. एका अनोख्या नात्याभोवती गुंफण्यात आलेली कथा बरेच प्रश्न अनुत्तरीत ठेवून संपते. कारण या चित्रपटाचा पुढचा भागही येणार आहे. त्यात दिग्दर्शक सिवा पहिल्या भागातील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.
कथानक : या चित्रपटात आजच्या काळाची १०७०मधील कथेशी सांगड घालण्यात आली आहे. गोव्यातील पोलिस कमिश्नरसाठी बाऊंटी हंटर म्हणून काम करणाऱ्या फ्रान्सिस आणि अँजेलिना यांच्यापासून चित्रपटाची कथा सुरू होते. प्रत्येक वेळी फ्रान्सिस गुंडाला पडकतो आणि अँजेलिना त्यावर स्वत:चा हक्क सांगण्यासाठी हजर होत असते. अशाच एका खतरनाक गुंडाच्या भावाला पकडण्यासाठी फ्रान्सिस जातो. तिथे त्याची हत्या होते. ती होताना एक मुलगा फ्रान्सिस आणि त्याच्या सहकाऱ्याला पाहातो. त्यानंतर कथानक १०७०मध्ये सुरू होते.
लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची कथा मानवी तत्त्वे आणि नीतीमूल्यांवर आधारलेली आहे. एका वचनाच्या पूर्ततेसाठी पूर्वीच्या काळातील लोक जीवाची पर्वा करत नव्हते. हेच चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. चित्रपट सुरू झाल्यानंतर नायक-नायिकेतील तू तू मैं मैं पाहताना कंटाळा येतो. कथा भूतकाळात गेल्यावर खऱ्या अर्थाने चित्रपट पकड घेतो. रोमन सम्राटाला पाच द्विपांवर राज्य करायचे असल्याने तो पेरुमाचीतील वीरांना टार्गेट करतो. तिथल्या राजाचा पराक्रमी मुलगा कंगुवा आहे. काही दृश्ये चांगली झाली आहेत, पण काही कंटाळवाणी वाटतात. गाणी सामान्य दर्जाची आहेत. व्हिएफएक्स तसेच भूतकाळातील वातवरणनिर्मिती चांगली आहे. अॅक्शन जबरदस्त आहे.
अभिनय : सूर्याने दोन्ही व्यक्तिरेखा पूर्ण ताकदीनिशी साकारल्या आहेत, पण टायटल रोलमधील कंगुवाच्या रूपात तो अधिक शोभून दिसतो. याउलट फ्रान्सिसच्या भूमिकेत थोडा ओव्हरस्मार्ट वाटतो. पुन्हा एकदा बॅाबी देओलचे भयानक रूप या चित्रपटात पाहायला मिळते. दिशा पटाणीची भूमिका रोमान्स, ब्रेकअप आणि भांडणांपुरतीच आहे. कंगुवाच्या भूतकाळाशी तिचा काही संबंध नाही. इतर कलाकारांनी मुख्य कलाकारांना चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, अभिनय, कला दिग्दर्शन, वातावरण निर्मिती, दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा, अॅक्शन
नकारात्मक बाजू : गीत-संगीत, काही अतार्किक दृश्ये
थोडक्यात काय तर वर्तमान आणि भूतकाळाची सांगड घालून तयार केलेला हा फँटसी अॅक्शन ड्रामा पाहण्याची इच्छा असल्यास एकदा चान्स घ्यायला हरकत नाही.