'इंडस्ट्रीमध्ये मी एकमेव असा अभिनेता आहे..'; देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर आमिरचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 01:35 PM2023-04-16T13:35:15+5:302023-04-16T13:36:04+5:30
Aamir khan: 'देशात राहण्यासाठी आता माझ्या कुटुंबियांना भीती वाटते. माझ्या पत्नीने मला देश सोडून जाण्याचं सुचवलं होतं', असं विधान आमिरने केलं होतं.
चित्रपटांच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ असलेला अभिनेता म्हणजे आमिर खान (Aamir khan). वर्षाकाठी केवळ एकच सिनेमा करणारा आमिर त्याच्या चित्रपटांची अत्यंत काळजीपूर्व निवड करत असतो. त्यामुळेच त्याचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो. आमिर जितका त्याच्या सिनेमांमुळे ओळखला जातो. तितकाच त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत येत असतो. यात बऱ्याचदा वादग्रस्त विधान करुन त्याने ट्रोलिंगचाही सामना केला आहे. अलिकडेच आमिरने भारतात राहण्याविषयी एक वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानावर आता त्याने त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
२०१५ मध्ये आमिरने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन एक वक्तव्य केलं होतं. 'देशात राहण्यासाठी आता माझ्या कुटुंबियांना भीती वाटते. माझ्या पत्नीने मला देश सोडून जाण्याचं सुचवलं होतं', असं विधान आमिरने केलं होतं. त्याच्या या विधानानंतर मोठा गदारोळ माजला होता. अनेकांनी त्याच्यावर टीकास्त्र डागलं होतं. मात्र, त्यावर आमिरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर बऱ्याच वर्षानंतर आमिरने आता पुन्हा एकदा त्याची नवीन बाजू मांडली आहे.
अलिकडेच आमिरने रजत शर्माच्या 'आप की अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी माझ्या त्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं त्याने म्हटलं.
काय म्हणाला आमिर?
“मी याच देशात जगेन आणि इथेच मरेन. त्यावेळी मुलांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून भावुक होऊन माझी पत्नी तसं बोलली होती. इंडस्ट्रीमध्ये मी एकमेव असा अभिनेता आहे. ज्याचं भारताबाहेर एकही घर नाहीये. माझ्याकडे जी काही २-४ घरं आहेत ती सगळी भारतात आहेत. मग असं असताना मी देश का सोडू? माझ्या त्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. इतकंच नाही तर अतिशयोक्तीही करण्यात आली, असं आमिर म्हणाला.
दरम्यान, गेल्या वर्षी आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची तुफान चर्चा रंगली होती. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला.