अभिमानास्पद! 'बिलबोर्ड कॅनडा मॅगजीन'मध्ये झळकला दिलजीत दोसांझ; हा सन्मान मिळवणारा पहिला भारतीय कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:28 AM2024-10-21T10:28:29+5:302024-10-21T10:31:28+5:30
प्रसिद्ध गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) कायमच त्याच्या गायिकीसह साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकतो.
Diljit Dosanjh : प्रसिद्ध गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) कायमच त्याच्या गायिकीसह साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकतो. अभिनयाबरोबरच गायनात निपुण असणाऱ्या दिलजीतने बॉलिवूडमध्ये आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या जगभरात त्याचे लाईव्ह कॉन्सर्ट सुरू आहेत. अशातच अभिनेत्याने त्याचे नावे नवा विक्रम रचला आहे. दिलजीतने पुन्हा एकदा भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. 'बिलबोर्ड कॅनडा मॅगीजीन'मध्ये झळकणारा तो पहिला भारतीय कलाकार ठरला आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
'बिलबोर्ड' ही प्रचलित अमेरिकन मॅगझीन आहे. या आठवड्यात बिलबोर्डची पहिली आवृत्ती निघणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय मॅगझीनच्या मुखपृष्ठावर ( पहिल्या पानावर) दिलजीतच्या 'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्ट दरम्यानचे काही महत्वाचे भाग दाखवले जातील.
अगदी काही दिवसांपूर्वीच बिलबोर्ड कॅनडाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्टद्वारे माहिती देण्यात आली. या पोस्टमध्ये लिहण्यात आलंय, "बिलबोर्डच्या विशेष आवृत्तीत प्रत्येक पानावर झळकणारा पहिला भारतीय कलाकार म्हणून दिलजीतने इतिहास रचला आहे. या बिलबोर्डच्या आवृत्तीमध्ये दिलजीत दोसांझच्या 'दिल लुमनाटी' दौऱ्यातील काही अविस्मरणीय क्षण शिवाय पडद्यामागील गोष्टी दाखविण्यात येणार आहेत".
या मॅगजीनचे कवर पेज लंडनमध्ये दिलजीतच्या एका कॉन्सर्टमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर ही बातमी काही क्षणातच वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर दिलजीतच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.