जय श्रीरामाचा जयघोष करत अभिनेता राजपाल यादवचा डान्स, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:12 PM2024-01-22T12:12:15+5:302024-01-22T12:13:18+5:30
राजपाल यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी, दिग्गज राजकारणी, समाजकारणी हे अयोध्येला पोहचत आहेत. संपुर्ण देशभरातील नागरिक भारतीय राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उत्सुक आहेत. अभिनेता राजपाल यादवही उत्साहात असल्याचं दिसून आलं.
राजपाल यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओत राजपाल यादव भररस्त्यात उत्साहाने डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्यानं झेंडा हातत धरून जय श्रीरामाचा जयघोषही केला. सध्या अयोध्येत सर्वत्र 'जय श्री राम'चा जयघोष ऐकायला मिळत आहे. श्रीरामाच्या भक्तीत फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील हिंदू तल्लीन झाले आहेत. फक्त अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशामध्ये पुन्हा दिवाळी असल्याची अनुभूती येत आहे.
अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूडसह टॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली आहे. यावेळी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगन, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मधुर भंडारकर, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, यश, प्रभास आणि मोहनलालसह अनेक सेलिब्रिटी काल सायंकाळीच अयोध्येत दाखल झाले आहेत.
अयोध्येतील ८ एकर जमिनीत हे राम मंदिर उभारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश- विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.