तुषार कपूरचा मुंबई लोकलने प्रवास! व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "विरार-चर्चगेट ट्रेनमध्ये..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 12:42 PM2024-05-26T12:42:12+5:302024-05-26T12:43:05+5:30
तुषारने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे.
लोकल हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकल ही मुंबईची लाइफलाइन आहे. पण, सर्वसामान्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनाहीमुंबई लोकलचं आकर्षण आहे. अनेक सेलिब्रिटी कधी कधी ट्राफिकचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. मुंबई लोकलमधली सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने मुंबई लोकलने प्रवास केला आहे.
तुषारने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे. ट्राफिकचा वेळ वाचवून वेळेत कामाचं ठिकाण गाठण्यासाठी तुषारने लोकलला पसंती दिल्याचं दिसत आहे. शनिवारी(२५ मे) रात्री विरार-चर्चगेट लोकलमधून तुषारने प्रवास केला. ट्रेनमध्ये विंडो सीट मिळाल्याचं सर्वसामान्यांप्रमाणेच तुषारलाही अप्रूप वाटलं. हा व्हिडिओ शेअर करत तो म्हणतो, "विरार-चर्चगेट ट्रेनमधल्या फर्स्ट क्लास डब्यात सीट मिळाली आहे, तर एक व्हिडिओ तर काढायलाच हवा ना...जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कामावरुन परतताना मुंबईच्या ट्राफिकवर मार्ग काढू शकता". त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
तुषार कपूर हा सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. २००१ साली तुषारने मुझे कुछ कहना है या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. 'गोलमाल', 'गुड बॉय बॅड बॉय', 'ढोल', 'क्या कूल हैं हम', 'धमाल' या सिनेमांध्ये तो कॉमेडी भूमिका साकारताना दिसला. तर 'शोर इन द सिटी', सिंबा, क्या दिल ने कहा, शूटआऊट अॅट लोखंडवाला या सिनेमांमध्ये तुषार कपूरच्या अभिनयाची वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
अभिनेता असण्याबरोबरच तुषार एक निर्मातादेखील आहे. वयाची पंचेचाळीशी उलटूनही अद्याप त्याने लग्न केलेलं नाही. २०१६मध्ये तुषार कपूर सरोगसीच्या पद्धतीने बाबा झाला. त्याच्या मुलाचं नाव लक्ष्य असं आहे.