मूल ‘दत्तक’ घेणारे बॉलिवूड कलाकार!

By Admin | Published: February 25, 2017 03:00 AM2017-02-25T03:00:29+5:302017-02-25T03:00:29+5:30

बॉलिवूड मध्ये मूल दत्तक घेणे म्हणजे पूर्वी खूप अडचणीचे समजले जायचे. आपले मूल कोणाला नको असते. मात्र विविध कारणांस्तव अनेक जण लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही मूल दत्तक घेतात

Bollywood actors taking 'adoptive' origins! | मूल ‘दत्तक’ घेणारे बॉलिवूड कलाकार!

मूल ‘दत्तक’ घेणारे बॉलिवूड कलाकार!

googlenewsNext

बॉलिवूड मध्ये मूल दत्तक घेणे म्हणजे पूर्वी खूप अडचणीचे समजले जायचे. आपले मूल कोणाला नको असते. मात्र विविध कारणांस्तव अनेक जण लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही मूल दत्तक घेतात. कर्करोगावर मात करीत आयुष्य पुन्हा नव्याने जगणारी ४६ वर्षीय अभिनेत्री मनीषा कोईराला हिने मुलगी दत्तक घेण्याचा नुकताच निर्णय घेतला. अर्थात, मूल दत्तक घेण्याचे प्रकार बॉलिवूडमध्ये नवीन नाहीत. प्रीती झिंटा, राहुल बोस यांनीही मोठ्या प्रमाणावर मुलांचे पालकत्व स्वीकारले. अलीकडच्या काळात मूल दत्तक घेण्याच्याबाबतीत सुश्मिता सेनचे नाव आघाडीवर आहे. बॉलिवूडमधील कोणत्या कलाकारांनी असा निर्णय घेतलाय, याची माहिती देत आहोत...

सुश्मिता सेन
पूर्वी असा कायदा होता, की दत्तक घेणारे पहिले मूल जर मुलगी असेल तर तुम्हाला दुसरी मुलगी दत्तक घेता येणार नाही. सुश्मिता सेनने लग्न केलेले नसले तरी तिने रिनी नावाची मुलगी दत्तक घेतली होती. अर्थात, तिला यासाठी खूप झगडावेही लागले होते. काही काळानंतर तिला लक्षात आले, की रिनीसोबत खेळायला आणखी एक जण हवे, म्हणून तिने आणखी एक मुलगी दत्तक घेतली... अलिसाह. उच्च न्यायालयाने निर्णय बदलल्याने सुश्मिताला दुसरी मुलगी दत्तक घेता आली. आज कोणत्याही कार्यक्रमात सुश्मिता आपल्या दोन्ही मुलींसह उपस्थित असते.

सलीम खान
लेखक, गीतकार सलीम खान यांना सलमान, अरबाज, सोहेल तीन मुले आणि अल्विरा ही मुलगी असताना त्यांनी आणखी एक मुलगी दत्तक घेतली... अर्पिता. खान कुटुंबीयाने अर्पिताचा खूप लाडात सांभाळ केला. तिचे लग्न अगदी थाटामाटात लावून दिले. सध्या अर्पिताला मुलगा आहे... अहिल, जो मामू सलमानचा खूपच लाडका आहे.
मिथुन चक्रवर्ती
मिथुनदा बॉलिवूडमधील मोठे नाव. चित्रपटातील त्यांच्या ‘दाता’ भूमिकेप्रमाणे प्रत्यक्षातही त्यांचे असेच वागणे आहे. त्यांना नमोशी, रिमोह आणि मिमोह ही तीन मुले असतानाही त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. रस्त्यावर कचरा वेचत असताना मिथुनदांचे या मुलीकडे लक्ष गेले आणि त्यांनी ही मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.


रविना टंडन
अभिनेत्री रविना टंडन हिने वयाच्या २१ व्या वर्षी दोन मुली दत्तक घेतल्या होत्या. छाया आणि पूजा. अनिल थडानी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी रविनाने हा निर्णय घेतला होता. आता रविनाला अनिल यांच्यापासून मुलगी राशा आणि मुलगा रणबीर अशी दोन मुले आहेत. इतक्या लहान वयात या दोन मुली दत्तक घेतल्यानंतर रविनाने त्यांचा खूप छान पद्धतीने सांभाळ केला. आपण केलेल्या चुका या आपल्या मुलींनी करू नयेत, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली होती.
सुभाष घई
सुभाष घई आणि त्यांची पत्नी रेहाना यांनी काही वर्षांपूर्वी मुलगी दत्तक घेतली होती... मेघना. अर्थात, सुभाष घई यांची ती पुतणी. मेघनाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वाढविले. मेघना सध्या व्हिसलिंग वूड्स ही वडिलांची फिल्म इन्स्टिट्यूट सांभाळते. मेघनालाही दत्तक घेतल्याचा अभिमान वाटतो.

नीलम
अभिनेत्री नीलम आणि तिचा पती अभिनेता समीर सोनी यांनीही मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. तिचे नाव होते... आहना. बिग बॉस सीझन चारनंतर या दोघांनी लग्न केले. अर्थात, त्यानंतर त्यांनी मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

कुणाल कोहली
दिग्दर्शक कुणाल कोहली आणि त्यांची पत्नी रविना यांनीही मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. दत्तक घेण्याच्या किचकट प्रक्रियेनंतर या मुलीला ते खूप चांगल्या पद्धतीने वाढवित आहेत, तिचे नाव ठेवले आहे... राधा.

Web Title: Bollywood actors taking 'adoptive' origins!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.