बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:25 PM2024-11-06T16:25:19+5:302024-11-06T16:26:02+5:30
आलिया भटची खास मैत्रीण आहे ही अभिनेत्री
अमेरिकेत काल निवडणूक पार पडली. तर आज डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनले. दरम्यान अमेरिकेची नागरिक असलेल्या एका बॉलिवूड अभिनेत्रीनेही काल मतदान केलं. तसंच आज ट्रम्प यांच्या विजयावर तिने नाराजी दर्शवली. तिची सोशल मिडिया पोस्ट चर्चेत आहे.
अमेरिकेत मतदान करणारी ही बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची अत्यंत जवळची मैत्रीण आहे. ३१ वर्षीय आकांक्षा रंजन कपूर (Akansha Ranjan Kapoor) अमेरिकेची नागरिक आहे. तिने काल सोशल मीडियावर मतदान केल्याचं शेअर केलं. आकांक्षा अमेरिकेची नागरिक असल्याचं समजताच सर्वांना धक्का बसला. तसंच तिने स्टोरी शेअर करत कमला हॅरिस यांचं स्टिकर लावल्याने तिने डेमोक्रेट पक्षाला मतदान केल्याचंही स्पष्ट झालं होतं.
दरम्यान आज अमेरिकेच्या निवडणूकांचा निकाल लागला. डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिसचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले. अमेरिकेतली अनेक सेलिब्रिटींनी कमला हॅरिसलाच पाठिंबा दिला होता. ट्रम्प यांच्या विजयावर आकांक्षाने नाराजी दर्शवत लिहिले, "हे पचवणं कठीण आहे. महिलांच्या अधिकारांची हार, पर्यावरणाच्या संरक्षणाची हार, अल्पसंख्यांकांसाठीच्या सहानुभूतीची हार, हिंसाचारावर प्रतिबंधाची हार. दुराचरण, द्वेष आणि वंशवाद जिंकला. महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणारा माणूस जिंकला. पण असो, स्टॉक मार्केट काही काळासाठी तरी वर येईल."
याशिवाय आकांक्षाने इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांचे ट्रम्पचे अभिनंदन केलेले ट्वीट शेअर करत लिहिले, 'आता आणखी युद्ध आणि मृत्यूसाठी सज्ज व्हा. एन्जॉय द कलयुग मित्रांनो."
आकांक्षा रंजन कपूर ही अभिनेता-दिग्दर्शक शशि रंजन आणि पत्नी अनु रंजन यांची मुलगी आहे. आकांक्षा आणि अभिनेत्री आलिया भट लहानपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत. आलियाची ती बेस्ट फ्रेंड असल्याचं अभिनेत्रीच म्हणाली होती. त्या शाळेत एकत्र होत्या. आलियाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'जिगरा' सिनेमात आकांक्षाचीही झलक दिसली होती.