प्रँकमुळे नाराज झाल्याने जुही चावला ७ वर्ष आमिर खानसोबत बोलली नव्हती! नेमकं काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 12:57 PM2024-11-13T12:57:06+5:302024-11-13T13:00:29+5:30
'इश्क' चित्रपटानंतर आमिर खान आणि जुही चावला यांची जोडी पडद्यावर पुन्हा एकत्र दिसली नाही.
Juhi Chawla: आमिर खान (Aamir Khan)आणि जुही चावला (Juhi Chawla) यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. 'कयामत से कयामत तक', 'हम है राही प्यार के, 'दौलत जंग की', 'आतंक ही आतंक' आणि 'तुम मेरे हो' यांसारख्या चित्रपटांमध्ये आमिर-जुही मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. जुही व आमिर हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पण, 'इश्क' हा चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा कधी एकत्र काम केलं नाही. यामागचं नेमकं कारण काय होतं? जाणून घ्या.
आमिर खान आणि जुही चावलाच्या फिल्मी कारकीर्दीतील 'इश्क' हा सातवा सिनेमा होता, ज्यामध्ये ते दोघे एकत्र दिसले. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, काजोल देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर खानने जुहीसोबत केलेली मस्करी भारी पडली होती. त्यामुळे जुही चावला अभिनेत्यावर प्रचंड रागावली होती. आमिर खानच्या प्रॅंकमुळे ती नाराज झाली आणि अक्षरश: रडायला लागली होती. शिवाय दुसऱ्या दिवशी जुही शूटिंगलाही आली नव्हती.
'इश्क' चित्रपटाच्या दिग्दर्शकांना ही माहिती कळताच ते आमिरला घेऊन जुही चावलाच्या घरी गेले होते. त्यानंतर अभिनेत्री सेटवर आली. किरकोळ वादामुळे जुही चावलाने आमिर खानसोबत बोलणचं बंद केलं होतं. जवळपास ७ वर्ष तिने अबोला धरला होता. पण, त्यानंतर जेव्हा आमिर खान पत्नी रिना दत्तासोबत घटस्फोट घेत असल्याचं तिला समजलं त्यावेळी जुही चावलाने सात वर्षांनंतर पहिल्यांदा फोन केला होता. जुही रिना दत्ता यांची चांगली मैत्रीण होती. त्यांचा संसार मोडू नये हा तिचा प्रयत्न होता.