"KBC पाहायला द्या", अशी अट ठेवत अभिनेत्रीने दिलेला सिनेमाला होकार; काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:17 PM2024-10-23T12:17:44+5:302024-10-23T12:29:20+5:30
एका अटीवर राखी गुलजार यांनी 'एक रिश्ता- द बॉन्ड ऑफ लव' चित्रपटासाठी होकार दिला होता. 'बिग बीं'ना रात्री २ पर्यंत करावं लागलं शूट, काय आहे प्रकरण? जाणून घ्या.
Amitabh bachchan And Rakhee Gulzar Movie: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली. पण त्यांची आणि अभिनेत्री राखी गुलजार (Rakhee Gulzar) यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. त्यांनी जवळपास १३ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे, ज्यामध्ये ११ चित्रपट सुपरहिट झाले. नुकताच दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी 'एक रिश्ता- द बॉन्ड ऑफ लव' या चित्रपटातील एक किस्सा सांगितला आहे.
'एक रिश्ता- द बॉन्ड ऑफ लव' चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, राखी, अक्षय कुमार, करिश्मा कपूर यांसारखी तगडी स्टारकास्ट चित्रपटात पाहायला मिळाली. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम रचले. हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा सातवा हिंदी चित्रपट ठरला. अशातच दिग्दर्शक सुनील दर्शन राखी गुलजार यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला आहे.
'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन म्हणाले, "मी 'एक रिश्ता- द बॉन्ड ऑफ लव' या चित्रपटासाठी कलाकारांना फायनल करण्यात केलं होतं. परंतु त्यामध्ये आईची भूमिकेसाठी योग्य चेहरा सापडत नव्हता. त्यानंतर राखी यांची निवड या रोलसाठी करण्यात आली. या भूमिकेसाठी त्या तयार झाल्या पण, त्यांनी माझ्यासमोर एक अट ठेवली होती. त्या म्हणाल्या की, रात्री ८.४५ ते १०.१५ या वेळेत त्या शूटिंला येणार नाहीत. शूटिंगच वेळापत्रक यानुसार तयार करा. जेव्हा मी त्यांना यामागील कारण विचारलं तेव्हा त्यांनी मी त्यावेळेत 'कौन बनेगा करोडपती' पाहते असं सांगितलं. ही गोष्ट मी अमिताभ बच्चन यांना सांगताच ते म्हणाले की, तुम्ही राखी यांना नकार देऊ नका. त्यांना शूटिंगला येऊद्या. मी माझं शेड्यूल बदलतो. मी करण जौहर यांच्यासाठी सकाळी ९ ते ६ यावेळेत काम करतो. त्य़ानंतर ७ वाजता मी या चित्रपटाचं शूटिंग करेन".
पुढे ते म्हणाले, "'बिग बीं'नी मला तेव्हा सांगितलं की राखी यांच्या वॅनिटी व्हॅनमध्ये एक टीव्ही लावा, त्यांना सेटवरून बाहेर जाऊ देऊ नका. त्या आनंदाने शूटही करतील आणि केबीसी देखील त्यांना पाहता येईल. असं करता करता या चित्रपटाचं शूटिंग ४ महिन्यात पूर्ण झालं".