वाढत्या खर्चामुळे बॉलिवूडला ग्रहण
By मनोज गडनीस | Published: October 6, 2024 11:24 AM2024-10-06T11:24:32+5:302024-10-06T11:24:56+5:30
मात्र गेल्या दीड वर्षापासून असे का होत आहे, हा कळीचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांत धडाकेबाज सिनेमा प्रदर्शित करत त्याद्वारे हजारो कोटी रुपयांचा गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडची सध्या वाढत्या खर्चामुळे डोकेदुखी वाढली आहे आणि याचा थेट परिणाम ४० पेक्षा जास्त बिग बजेट चित्रपट रखडण्याच्या रूपाने दिसून येत आहे. आजवर बॉलीवूडने अनेक बिग बजेट चित्रपटांची निर्मिती केली. बहुतांश चित्रपट उत्तम चालले, तर काही पडले. यामुळे निर्मात्यांचे आर्थिक नुकसानही झाले. मात्र यामुळे चित्रपटांची निर्मितीच बंद झाली किंवा चित्रपट बासनात गुंडाळले असे यापूर्वी फार वेळा झाले नाही. मात्र गेल्या दीड वर्षापासून असे का होत आहे, हा कळीचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
चित्रपट उद्योगातील जाणकारांच्या मते याची दोन ते तीन प्रमुख कारणे आहेत. पहिला मुद्दा हा केवळ चित्रपट निर्मितीच्या अंगाने पाहू. चित्रपट उत्तम चालावा, असे वाटत असेल तर कायमच प्रथितयश कलाकारांना सिनेमात घेण्याकडे निर्माता आणि दिग्दर्शक या दोघांचा कल असतो. पण सध्या बॉलीवूडचा कोणताही चित्रपट असो, चित्रपटाच्या एकूण बजेटपैकी ४० टक्क्यांच्या आसपास रक्कम ही या कलाकारांच्या मानधनावर खर्च होत आहे. कथा आणि पटकथेनुसार लोकेशन्स, ग्राफिक्स यामध्येही मोठ्या प्रमाणावर पैसा खर्ची पडत आहे.
वेबसीरिजची निर्मितीदेखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तिथेही तांत्रिक कर्मचाऱ्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे त्यांचे मानधनही जवळपास दीडपटीने वाढले आहे. वर नमूद या घटकांमध्ये जितका पैसा खर्च होत आहे साधारणपणे तितकाच पैसा हा चित्रपटाचे प्रमोशन अन् मार्केटिंगवर खर्च होत आहे.
एक नव्हे तीन व्हॅनिटी व्हॅन्स
केवळ मानधन नाही तर कलाकारांचा लवाजमा आणि त्यांचा खर्चही वाढत आहे. आजच्या घडीला बॉलीवूडमधील किमान १० ते १२ स्टार असे आहेत की त्यांना शूटिंगच्या वेळी स्वतःसाठी तीन व्हॅनिटी व्हॅन्स लागतात. एकात मेक-अप तयारी, दुसऱ्यामध्ये जीम, तिसऱ्यात जेवण किंवा मीटिंग्ज. चित्रपट निर्मितीत हा खर्च कमी वाटत असला तरी पैशाचे सोंग आणता येत नाही.
याचे कारण म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांना ओटीटी प्लॅटफॉर्मने आकर्षित केले. जगभरातील विविध विषय लोकांना पाहायला मिळाले. लोकांची अभिरुची बदलत गेली किंवा वृद्धिंगत होत गेली. त्यामुळे बॉलीवूडच्या साचेबद्ध फॉर्मेटमध्ये लोकांना कितपत रस राहिला आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे. याच विषयावर परिणाम करणारा आणखी एक मुद्दा असा की, गेल्या काही वर्षांपासून सिनेमागृहांचे स्वरूप बदलले आहे. सिंगलस्क्रीन सिनेमा मागे पडत, त्याची जागा मल्टिप्लेक्सने घेतली आहे. बहुतांश मल्टिप्लेक्स हे मॉलमध्ये आहेत.
ओटीटी सबस्क्रिप्शनच परवडते...
चौकोनी कुटुंब मॉलमध्ये गेले की एका चित्रपटाचा खर्च तीन ते चार हजार रुपयांना पडतो. या पैशामध्ये ओटीटीचे किमान सहा महिन्यांचे सबस्क्रिप्शन येते. त्यामुळे सिनेमागृहात जाण्यापेक्षा दीड-दोन महिन्यांनी तोच चित्रपट घरीही पाहता येतो. त्यामुळे लोकांची बदलती अभिरुची आणि दुसरीकडे वाढत्या खर्चाची कसरत, अशी कसरत बॉलीवूडला करावी लागणार आहे.