मराठी शिकण्याची माझी गोष्ट...; मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने सांगितला भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 10:55 AM2022-02-27T10:55:42+5:302022-02-27T10:58:40+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात नितांत आदर असून, एकदा तरी महाराजांची भूमिका साकारण्याची तीव्र इच्छा आहे, असे आमिर खानने म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. मला एकदा तरी शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची तीव्र इच्छा आहे.
आज मला मराठीबद्दल इतका आत्मविश्वास आहे की, जर उत्तम संहिता मिळाली तर मला मराठी सिनेमा करण्याची अतीव इच्छा आहे. माझी अडचण अशी आहे की, माझी मातृभाषा उर्दू. ती मला बोलता येते. परंतु, उर्दू लिपी वाचता येत नाही. मात्र, मराठी भाषा ही देवनागरी लिपित असल्यामुळे ती वाचता येत असे. परंतु समजत नसे. मातृभाषा आणि राजभाषा या दोन्हीच जिव्हाळ्याच्या!, कालौघात मराठी शिकलो. पण उर्दू लिपी शिकण्याचे स्वप्न मात्र अजूनही बाकी आहे.
माझे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले असले तरी शाळेत मराठी विषय अभ्यासाला होता; पण, मराठीशी तितकेसे सूत जुळलेच नाही. मराठीत जेमतेम काठावर गुण मिळायचे. मित्रपरिवारही हिंदी-इंग्रजीत बोलायचे. त्यामुळे तीच संवादाची अन् व्यवहाराची भाषा झाली. मला माझी राजभाषा येत नाही, याची तेव्हापासून लाज वाटायची. मात्र, वयाच्या चाळिशीत प्रवेश केल्यावर मला प्रकर्षाने जाणवले की आपल्याला आपली राजभाषा न येणे हे अत्यंत खेदाचे आहे. त्यातूनच मराठी शिकण्याचा निश्चय झाला.
...तर माझ्या मराठीच्या वर्गाचा एक किस्साच आहे. मराठी शिकण्याचा निर्णय मी किरण, माझा मुलगा जुनैद, मुलगी आरा यांना सांगितला. त्यांनीदेखील माझ्यासोबत मराठी शिकण्याची तयारी दर्शवली. अभिनेता मित्र अतुल कुलकर्णी यांच्याशी या संदर्भात बोलणे झाले आणि त्यांनी मला सुहास लिमये या शिक्षकांशी संपर्क करून दिला. लिमये सरांचा मराठीचा वर्ग आमच्या घरी नियमित भरू लागला; पण पहिल्या दोन वर्गांनंतर सर्वप्रथम आरा त्या वर्गातून गळली. पाठोपाठ जुनैद व काही दिवसांनी किरणही गळाली, अन् उरलो एकटा मीच ! मात्र, माझा निश्चय भक्कम होता व चार वर्षे मी मराठी शिकलो.
शूटिंगच्या दरम्यान, लिमये सर सोबत असायचे. सरांनी मला मराठीमधील प्रतिभावान लेखक, कवी यांच्या साहित्याशी ओळख करून दिली. कालिदासाचे मेघदूतही उद्धृत केले. भाषा शिक्षणाच्या वाटेवरून साहित्याच्या या प्रवासात मला प्रतिभा आणि कल्पनांचे नवे अवकाश गवसले. या प्रवासात मी केवळ मराठी भाषाच शिकलो नाही तर, भाषा या संकल्पनेविषयीच्या मूलभूत चिंतनाची बीजं मनात पक्की रुजली. मला वाटतं की, निःसंशयपणे भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. मात्र, याही पलीकडे जाऊन पाहिले तर, मनातील उत्कट भावना प्रभावीपणे व्यक्त करण्याची ताकद असलेल्या भाषेची नाळ ही स्थानिक संस्कृतीशी जुळलेली आहे.
रंगपटावरील कलाकारांना अभिव्यक्त होण्यास समृद्ध करते ती भाषाच! भाषा जोवर उत्तम येत नाही, तोवर तो कलाकार पूर्णतः उमलत नाही. केवळ भाषा ठाऊक नसल्यामुळे त्या भाषेमधे उत्तम साहित्यनिर्मिती होऊनही मला त्यातून काही कलाविष्कार साकारता आले नाही. कारण, भाषेचा संबंध हा अभिव्यक्त होण्यासाठी आवश्यक भावनेशी निगडित आहे. कदाचित या विचारमंथनातूनच माझा, मी राहात असलेल्या महाराष्ट्राची मराठी ही राजभाषा शिकण्याचा निर्धार अधिकाधिक पक्का झाला असावा.
शब्दांकन : मनोज गडनीस