बॉलीवूड स्टार्सना राजकीय फटका
By Admin | Published: November 26, 2015 02:02 AM2015-11-26T02:02:54+5:302015-11-26T02:02:54+5:30
बॉलीवूडमधील अनेक स्टार्स राजकारणाच्या वाटेने चुकूनही जात नाहीत. पण म्हणून ते राजकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेवू शकतात, असेही नाही. ते सामाजिक विषयावरही बोलले तरी काही जण आपल्या सोयीने
बॉलीवूडमधील अनेक स्टार्स राजकारणाच्या वाटेने चुकूनही जात नाहीत. पण म्हणून ते राजकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेवू शकतात, असेही नाही. ते सामाजिक विषयावरही बोलले तरी काही जण आपल्या सोयीने त्याचा राजकीय अन्वयार्थ काढतात आणि अकारण वाद निर्माण करतात. असेच काहीसे पुन्हा घडले आहे. शाहरूख खाननंतर आता आमीर खानदेखील असहिष्णुतेच्या मुद्द्यामुळे वादात सापडला आहे. यापूर्वी शाहरूख खानने एका दूरचित्रवाणी मुलाखतीत देशाच्या स्थितीबाबत वक्तव्य केले होते तेव्हा राजकीय वर्तुळात त्याबाबत मोठा हंगामा झाला. भाजपाच्या काही नेत्यांनी तर शाहरूखला देशाचे गद्दार म्हणण्यापासून पाकिस्तानला निघून जाण्याचाही सल्ला दिला होता. आता एक वर्ग आमीर खानला निशाणा बनवीत आहे. यापूर्वी राजकुमार हिरानी यांच्या पीके चित्रपटामुळेही आमीर खानला अशाच प्रकारे निशाणा बनविले गेले होते.
दिल्लीला जाऊन नर्मदा बचाओ आंदोलनाचे समर्थन करतानाही आमीरला असाच अनुभव आला होता. गुजरातमध्ये आमीरच्या फना चित्रपटाला प्रदर्शित होऊ दिले नव्हते. केवळ आमीर खान आणि शाहरूख खानच नव्हे, सध्याच्या काळात जेव्हाही कोणत्या स्टारने काही असे वक्तव्य केले तर त्याच्यावर कठोर टीका केली जात आहे. सलमान खानबाबतचा किस्साही ताजाच आहे. त्याने याकूब मेमनला फाशी देण्याच्या वेळी टिष्ट्वटरवर काही
पोस्ट केले आणि ज्यामुळे वाद निर्माण झाला. काही काळापूर्वी देशात लव जिहादबाबत
वातावरण तापले होते, तर सैफ अली खान आणि करिना कपूर यांनाही टार्गेट बनविले गेले होते. दीपिका पदुकोणने जेव्हा विवाहापूर्वी आणि विवाहानंतर कोणासोबतही संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केले तेव्हा तिच्यावरही जोरदार टीका झाली होती.
- anuj.alankar@lokmat.com