संपत्तीसाठी 11 वर्ष नातेवाईकांनी झिजवल्या कोर्टाच्या पायऱ्या; अखेर कोणाला मिळाली परवीन बाबीची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:38 PM2023-03-16T12:38:45+5:302023-03-16T12:39:19+5:30
Parveen Babi: प्रसिद्ध, पैसा, संपत्ती सारं काही परवीन यांच्या जवळ होतं. पण, शेवटच्या दिवसात त्यांचं आपलं असं कोणीही त्यांच्याजवळ नव्हतं. ज्यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या.
बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी (Parveen Babi). कलाविश्वातील अत्यंत बोल्ड आणि मादक पण तितकीच उत्तम अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. संपूर्ण आयुष्य प्रसिद्धी आणि झगमगाटात घालवणाऱ्या परवीन बाबी यांच्या मृत्यू अत्यंत दुर्दैवी झाला. त्यांच्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला होता. इतकंच नाही तर, त्यांच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाणही आलं होतं. यामध्येच परवीन बाबी यांनी त्यांच्या अमाप संपत्तीचं काय केलं हा प्रश्न आजही अनेकांना पडतो.
यशाच्या शिखरावर असलेल्या परवीन बाबी यांना पॅरानाइड स्कित्जोफ्रेनिया हा मानसिक आजार झाल्याचं म्हटलं जातं. या आजारामुळेच त्यांचं निधन झालं असंही म्हटलं जातं. १९८३ मध्ये परवीन विदेशात स्थायिक झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर १९८९ मध्ये त्या पुन्हा मायदेशी परतल्या. परंतु, यावेळी त्यांच्यात कमालीचा बदल झाला होता. वाढलेलं वजन, निस्तेज चेहरा यामुळे त्यांना ओळखणंही कठीण होतं.
परवीन बाबी अखेरच्या दिवसात होत्या एकट्या
प्रसिद्ध, पैसा, संपत्ती सारं काही परवीन यांच्या जवळ होतं. पण, त्यांच्यासोबत कोणतीही जवळची व्यक्ती नव्हती. त्यामुळे त्या प्रचंड एकट्या पडल्या होत्या. त्यांचं एकटेपण इतकं वाढलं होतं की त्याचा परिणाम त्यांच्या मनावरही झाला. त्यामुळे सतत कोणी तरी आपल्याला जीवे मारतंय असं त्यांना वाटायचं.
तीन दिवस मृतदेह होता घरात
परवीन बाबी यांचा मृत्यू झाला हे कोणालाही कळलं नव्हतं. त्यामुळे जवळपास ३ दिवस त्यांचा मृतदेह घरातच होता. त्यांच्या दरवाज्याबाहेर ठेवलेले ब्रेड-दूध तीन दिवसांपासून त्याच जागी होते. त्यामुळे शेजारच्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं. २० जानेवारी २००५ रोजी जुहूमधील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
काय झालं परवीन यांच्या संपत्तीचं?
परवीन बाबी या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट त्या काळात दिले होते. त्यामुळे सहाजिकच त्यांची संपत्तीदेखील तितकीच होती. परंतु, त्यांच्या निधनानंतर या संपत्तीचं काय झालं हा प्रश्न अनेकांना पडला. कारण, त्यांच्या पश्चात अशी एकही व्यक्ती त्यांचा वारसदार म्हणून नव्हती. परवीन यांच्या मृत्यूनंतर जवळपास 11 वर्ष त्यांच्या संपत्तीचा वाद कोर्टात चालला. त्यांच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. या वादावर 11 वर्षानंतर पडदा पडला होता. न्यायालयाने परवीन यांच्या मृत्यूपत्राला मंजुरी दिली. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार, परवीन यांच्या संपत्तीचा 80 टक्के भाग गरजू महिला आणि मुलांच्या मदतीकरता देण्यात आला आणि 20 टक्के भाग तिच्या मामाला मिळाला.
दरम्यान, परवीन याच्या नावे जुहूमधला समुद्रकिना-याजवळचा चार बेडरुमचा फ्लॅट, जुनागढ येथील हवेली, सोनं, बँकेत असलेले 20 लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट आणि अन्य पैसे इतकी संपत्ती होती.