भाईचा बड्डे... सलमानच्या भेटीसाठी ११०० किमी सायकलप्रवास, 'दंबग'स्टारने असं केलं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 03:27 PM2023-01-02T15:27:12+5:302023-01-02T15:28:21+5:30
जबलपूरचा समीर हा सलमानचा मोठा चाहता आहे, सलमानला भेटण्यासाठी समीर हा जबलपूरहून मुंबईला सायकलने प्रवास करत पोहोचला.
बॉलिवुडचा दबंग सलमान खान नुकताच 57 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सलमानच्या बांद्रा येथील घरी पार्टीचे आयोजन केले होते. त्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले होते. पार्टीत सलमान शाहरुखची गळाभेट आणि एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलाणीच्या कपाळावर केलेल्या किसची जोरदार चर्चा झालीच. याशिवाय, सल्लूभाईच्या घराबाहेर चाहत्यांच्या जमलेल्या गर्दीचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. सलमानला शुभेच्छा देण्यासाठी देशभरातून चाहते आले होते. मात्र, एका चाहत्याला सलमानने विशेष भेट दिली. तर, त्याला जेवणही केलं.
जबलपूरचा समीर हा सलमानचा मोठा चाहता आहे, सलमानला भेटण्यासाठी समीर हा जबलपूरहून मुंबईला सायकलने प्रवास करत पोहोचला. ७ दिवसांच्या प्रवासानंतर त्याची दबंग हिरो सलमान खानसोबत भेट झाली. सलमानच्या वाढदिवसाला पोहोचण्यासाठी २२ डिसेंबर रोजी तो जबलपूरहून निघाला होता, ११०० किमीचा प्रवास केल्यानंतर ७ दिवसांनी २९ डिसेंबर रोजी तो मुंबईत पोहोचला. कडाक्याच्या थंडीत अनेक अडचणींचा सामना करत तो अखेर आपल्या लाडक्या स्टार हिरोच्या भेटीला पोहोचला. सलमानच्या बांद्रा येथील गॅलक्झी बंगल्याबाहेर समीर थांबला होता. त्यावेळी, तेथील सुरक्षा रक्षकाने आतमध्ये सलमानपर्यंत ही माहिती दिली. त्यानंतर, रात्री जवळपास ३ वाजता सलमान खान आपल्या जबरा फॅनला भेटण्यास खाली उतरला.
सलमानाने समीरला प्रवास कसा झाला असं विचारले. तसेच, आपल्या बंगल्यात जेवणंही दिलं. त्यानंतर, दुसऱ्यादिवशी समीर जबलपूरकडे रवाना झाला. समीर हा सलमानचा जबरा फॅन असून तो दरवर्षी २७ डिसेंबरला सलमानच्या वाढदिनी मुंबईत येतो, दरवर्षी सलमानच्या भेटीची अपेक्षा करतो. मात्र, यावेळी त्याचे स्वप्न पूर्ण झाले. समीरला सलमानची भेट मिळालीच.
दरम्यान, सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त गॅलेक्सीमध्ये मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. चाहत्यांनी दिवसा गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हजेरी लावली. सलमानचे घर मुख्य रस्त्यावर असल्यामुळे चाहत्यांनी रस्त्यावरच मोठी गर्दी केली. ही गर्दी आटोक्यात आणणे पोलिसांनाही कठीण गेले.