क्या बात! भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकत नॅशनल क्रश मेधा शंकरची मोठी कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 18:11 IST2024-02-23T18:08:18+5:302024-02-23T18:11:31+5:30
अभिनेत्री मेधा शंकर 12th Fail सिनेमातून नॅशनल क्रश ठरली.

क्या बात! भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकत नॅशनल क्रश मेधा शंकरची मोठी कामगिरी
आयपीएस मनोज शर्मा (IPS Manoj Sharma) यांच्या जीवनावर आधारित 12th Fail या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातून अभिनेत्री मेधा शंकर रातोरात स्टार झाली. या सिनेमामुळे ती नॅशनल क्रश बनली असून तिच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इंडस्ट्रीत अनेक वर्षे स्ट्रगल केल्यानंतर मेधाला यशाची किल्ली सापडली आहे. आता तिच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मेधा शंकरने MDb 'ब्रेकआउट स्टार' स्टारमीटर पुरस्कार पटकावला आहे. हा विशेष गौरव झाल्याने मेधा शंकरने आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली, 'IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. ही अतिशय विशेष बाब आहे. प्रेक्षकांचं प्रेम माझ्यासाठी सर्वांत मोठं आहे. मला आणि या भुमिकेला इतके प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांचे खूप आभार मानते'.
मेधा शंकरला जानेवारीमध्ये प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या टॉप 10 यादीत तीन वेळेस स्थान मिळाले व दोन आठवडे ती पहिल्या स्थानावर होती. तर 12th Fail हा सिनेमा सध्या सर्वोच्च 250 भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहे व त्याचे IMDb युजर रेटींग 9.1 आहे. IMDB app वर सर्वाधिक परफॉर्म करणाऱ्या प्रसिद्ध कलाकारांना पुरस्कारांनी नावाजले जाते. त्यामध्ये जगभरातून दर महिन्याला IMDb वर येणाऱ्या 20 कोटीपेक्षा विजिटर्सचे वास्तविक पेज व्ह्यूज लक्षात घेतले जातात.
12th Fail हा मेधा शंकरचा पहिला सिनेमा नाही. तिने याआधी एका ब्रिटिश सीरिजमध्ये तसंच आणखी एका सिनेमात काम केलं आहे. मेधा शंकरने २०२१ मध्ये शादीस्थान या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. हा तिचा पहिला सिनेमा होता. 12th Fail अभिनेत्रीला डॉक्टर बनायचं होतं. पण कॉलेजच्या एका मित्राच्या सांगण्यावरुन तिने त्याच्या शॉर्ट फिल्मसाठी ऑडिशन दिलं. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचं ठरवलं. मेधा शंकर डान्सरदेखील आहे.