विक्रांत मेसीला अभिनय क्षेत्रात पहिला ब्रेक कसा मिळाला ? खुलासा करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 12:09 PM2024-04-03T12:09:24+5:302024-04-03T12:09:41+5:30
अभिनेता विक्रांत मेसीचा आज (3 एप्रिल) वाढदिवस आहे.
'12th फेल', 'हसीन दिलरुबा' आणि 'छपाक' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयानं लोकांची मने जिंकणारा अभिनेता विक्रांत मेसीचा आज (3 एप्रिल) वाढदिवस आहे. टीव्हीच्या दुनियेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा विक्रांत हा अप्रतिम डान्सर आहे. अभिनेता होण्यापूर्वी तो श्यामक दावरच्या 'धूम मचाओ धूम' या शोमध्ये कोरिओग्राफर देखील होता. पण विक्रांत मॅसीला अभिनयात पहिला ब्रेक कधी आणि कसा मिळाला हे तुम्हाला माहिती आहे का? याबद्दल जाणून घेऊया.
विक्रांतला वॉशरूमबाहेर पहिला ब्रेक मिळाला होता. चाहत्यांना आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. विक्रांत मेसीने अलीकडेच 'मॅशेबल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनयात त्याला पहिला ब्रेक कसा मिळाला, याचा खुलासा केला. तो म्हणाला, 'मी मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या वॉशरूमबाहेर रांगेत उभा होतो. तेव्हा एका महिलेने मला टीव्ही शोमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली. एक स्त्री माझ्याकडे आली आणि विचारलं तुला अभिनय करायला आवडेल का? मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला त्याच्या कार्यालयात यायला सांगितलं'.
विक्रांत पुढे म्हणाला, 'जेव्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहचलो. तेव्हा त्यांनी मला एका एपिसोडसाठी 6,000 रुपये मिळतील आणि मला एका महिन्यात 4 एपिसोड शूट करावे लागतील असं सांगितलं. मी ताबडतोब हिशोब केला तर मी महिन्याला २४ हजार रुपये कमवत होतो. मी लगेच हो म्हणालो. मला नेहमीच अभिनेता व्हायचं होतं. पैशाबद्दल ऐकून मी हो म्हटलं असं नाही. काम करताना शिकेन असं वाटलं'.
विक्रांत मॅसी लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. विक्रांतचा 2008 मध्ये पहिला टीव्ही शो आला होता, त्याचं नाव 'धरम वीर' होतं. यानंतर तो 'बालिका वधू', 'बाबा ऐसा वर धुंडो', 'कबूल है' आणि 'गुमराह'सह 'झलक दिखला जा' या डान्स रिॲलिटी शोमध्येही दिसला होता. यानंतर त्यानं मोठी उडी घेतली. 2013 मध्ये विक्रांतने 'लुटेरा' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तो 'दिल धडकने दो', 'हाफ गर्लफ्रेंड', 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला. विक्रांतने 'मिर्झापूर', 'ब्रोकन बट ब्यूटीफुल', 'क्रिमिनल जस्टिस' आणि 'मेड इन हेवन' यांसारख्या वेब सीरिजही केल्या आहेत. आता तो 'मुंबईकर' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात साऊथ स्टार विजय सेतुपतीचीही भूमिका आहे.