रानू मंडलच्या आधी स्टेशनवर भीक मागणाऱ्या या मुलीला मिळाली होती बॉलिवूडमध्ये संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 05:37 PM2019-09-14T17:37:08+5:302019-09-14T17:38:10+5:30
रानूच नव्हे तर रेल्वे प्लॅटफोर्मवर गात असलेल्या एका 16 वर्षीय मुलीला देखील काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला होता.
काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आज एक बॉलिवूड स्टार बनली आहे. रेल्वे स्टेशनवरून रानू थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये पोहोचली आणि तिने एक नाही तर तीन गाणी रेकॉर्ड केलीत. रानूने बॉलिवूडसाठी गायलेले पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले असून या गाण्याला रसिकांची पसंती मिळत आहे.
रानू मंडल हे नाव सध्या घराघरात पोहोचले आहे. तिची सध्या मीडियात, सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे. हिमेश रेशमियाने तिला गायनाच्या क्षेत्रात पहिला ब्रेक दिला असून तिची गाणी रसिकांना प्रचंड आवडत आहेत. लता मंगेशकर यांनी गायलेले एक प्यार का नगमा है गाणे रानू रेल्वे स्टेशनवर नेहमीच गात असत. रानू मंडलच्या सुरेल आवाजातलं 'एक प्यार का नगमा' असं काही सुपरहिट झालं की प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला. कधी काळी ती रानाघाटच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात भीक मागत होती. पण या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रानूला लोकप्रियता मिळाली. पण केवळ रानूच नव्हे तर रेल्वे प्लॅटफोर्मवर गात असलेल्या एका 16 वर्षीय मुलीला देखील काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला होता.
अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील मेरा जूता फेक लेदर दिल छिछालेदर हे गाणे चांगलेच गाजले होते. हे गाणे गाणारी दुर्गा ही पूर्वी रेल्वेमध्ये भीक मागून आपले आणि आपल्या कुटुंबियांचे पोट भरत असे. पण दिग्दर्शक आनंद सुरापूर यांनी दुर्गा यांचा आवाज ऐकला आणि त्यांनी स्नेहा खानवलकरकडे दुर्गाला ऑडिशनसाठी जाण्यास सांगितले. स्नेहाने दुर्गाचा आवाज ऐकल्यानंतर तिला तिचा आवाज खूप आवडला आणि तिचा आवाज मेरा जूता फेक लेदर दिल छिछालेदर या गाण्यासाठी एकदम योग्य वाटला आणि तिने अनुरागशी चर्चा करून तिला गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात गाण्याची संधी दिली. हे गाणे चांगलेच हिट झाले. पण या गाण्यानंतर दुर्गाला कोणतीही संधी न मिळाल्याने ती सध्या बॉलिवूडपासून दूर आहे.