16 Years :‘गदर’मधील ‘या’ सीन्ससाठी दिग्दर्शकाने सख्या मुलाचा जीव घातला होता धोक्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2017 05:14 PM2017-06-18T17:14:31+5:302017-06-18T22:46:05+5:30

अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाला आज १६ वर्षे पूर्ण झाले आहेत. ...

16 Years: In the 'Ghadar', the director was responsible for 'these' scenes in danger! | 16 Years :‘गदर’मधील ‘या’ सीन्ससाठी दिग्दर्शकाने सख्या मुलाचा जीव घातला होता धोक्यात!

16 Years :‘गदर’मधील ‘या’ सीन्ससाठी दिग्दर्शकाने सख्या मुलाचा जीव घातला होता धोक्यात!

googlenewsNext
िनेता सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाला आज १६ वर्षे पूर्ण झाले आहेत. १५ जून २००१ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी तब्बल ७७ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर चित्रपटाच्या लाइफ टाइम कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास या चित्रपटाने तब्बल ४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एका वेबसाइटला मुलाखत दिली असता, चित्रपटाशी संबंधित काही रोचक माहिती सांगितली. अनिलने म्हटले की, या चित्रपटातील एका सीन्ससाठी मी माझ्या मुलाच्या जीवाचा डाव लावला होता. आता तुम्ही म्हणाल की, अनिल कोणत्या मुलाविषयी बोलत आहे, तर त्याचा उलगडा तुम्हाला खाली दिलेली माहिती वाचल्यानंतर होईल. 



चित्रपटात सनी आणि अमिषाचा मुलगा दाखविण्यात आला आहे. हा मुलगा दुसरा तिसरा कोणीही नसून, दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. या चित्रपटाच्या आठवणी ताज्या करताना अनिलने म्हटले की, ‘मी स्वत:ला याकरिता दोषी समजत आहे. कारण एका सीनसाठी मी खूपच सेल्फीश झालो होतो. कारण या सीनसाठी मला माझ्या मुलाच्या जीवाशी खेळ खेळावा लागला. हा सीन म्हणजे सनी आणि अमिषाला चालत्या ट्रेनमध्ये एका बोगीवरून दुसºया बोगीत उडी घेऊन जायचे होते. हा सीन करताना सनीच्या खांद्यावर त्याचा मुलगा म्हणजेच माझा रिअल मुलगा उत्कर्ष होता. शूटिंगवेळी ट्रेनचा स्पीड ४० किलोमीटर प्रती तास असा होता. अशात हा सीन मुलाला घेऊन चित्रित करणे माझ्यासाठी खूप मोठी रीस्क घेण्यासारखा होता. जेव्हा हा सीन शूट केला गेला तेव्हा मी माझे डोळे बंद केले होते. कारण मला हे सर्व उघड्या डोळ्याने बघणे शक्यच नव्हते. माझे हृदय धडधडत होते. कारण थोडीसीदेखील चूक झाली असती तर ती माझ्या मुलाच्या जीवावर बेतली असती, असे अनिलने सांगितले. 



पुढे बोलताना अनिलने म्हटले की, जेव्हा ट्रेन थांबली अन् कट असा आवाज आला तेव्हा मी माझे डोळे उघडले. तेव्हा उत्कर्ष सनीबरोबर खेळत होता. त्याला बघून माझ्या जीवात जीव आला. या निर्णयासाठी मी आजही स्वत:ला दोष देतो. आजही जेव्हा मी त्या सीनविषयी विचार करतो, तेव्हा मला खूप टेन्शन येते. आज या गोष्टीला १६ वर्षे पूर्ण झाले आहेत. परंतु ही घटना माझ्या मनातून जाण्यास तयार नाही. अनिल म्हणतो की, आम्ही अमृतसर येथे हा भयानक सीन शूट करीत होतो. जिथे रक्ताने लतपथ एक ट्रेन पाकिस्तानातून अमृतसर येथे येत असते. ट्रेनमध्ये सरदार आणि त्यांच्या फॅमिलीजची डेड बॉडीज भरलेल्या असतात. या सीन्ससाठी मी अनेक सरदारांशी चर्चा केली होती. त्यांना सांगितले होते की, जेव्हा ट्रेन थांबणार तेव्हा तुम्हाला रडावे लागेल. त्यानुसार सर्व सरदार रडायला लागले. सीन अगदी व्यवस्थित शूट झाला. त्यामुळे मी लगेचच कट म्हटले; मात्र सर्व सरदार ऐवढे इमोशन झाले होते की, त्यांचे रडणे थांबत नव्हते. कित्येक वेळ त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. जेव्हा मी एका सरदाराला म्हटले की, सीन संपला आहे, आता रडणे थांबवा; तेव्हा त्याने म्हटले की, कित्येक वर्षांपूर्वी माझी फॅमिलीदेखील अशीच रक्तात लतपत होऊन मृतावस्थेत ट्रेनमध्ये आणण्यात आली होती. हा सीन तुमच्यासाठी चित्रपट आहे; परंतु आमच्यावर हे रिअल लाइफमध्ये बेतले आहे. त्या सरदारची ही कथा ऐकून माझे मन सुन्न झाले होते, असेही अनिलने सांगितले. 



पुढचा प्रसंग सांगताना अनिलने म्हटले की, अमृतसरच्या एका छोट्याशा गावच्या स्टेशनवर चित्रपटाची शूटिंग सुरू होती. तेव्हा शूटिंग बघण्यासाठी तब्बल चार लाख लोक आले होते. तेथील लोक सनीला बघण्यासाठी ऐवढे क्रेजी झाले होते की, संपूर्ण रेल्वे ट्रॅक लोकांच्या गर्दीने भरला होता. यामुळे ट्रेनचे शेड्यूल्ड डिस्ट्रर्ब झाले. कित्येक तास या स्टेशनवरून एकही ट्रेन गेली नव्हती. हे आमच्यासाठी सरप्राइजिंग होते. अनिल म्हणतो की, आम्ही बºयाचशा लोकेशंसवर चित्रपटाचे शूटिंग केले. लखनऊ, डलहौजी, पठाणकोट, ला मार्टिन बॉइज स्कूल, सरना, अमृतसर, रुदौली याठिकाणी बरेचसे शॉट शूट करण्यात आले. चित्रपटात दाखविण्यात आलेला लाहोरचा (पाकिस्तान) सेट लखनऊ येथे लावण्यात आला होता. मार्टिन बॉइज स्कूलमध्ये हा हेरिटेज लुकवाला सेट लावण्यात आला होता. या सीनमध्ये सनीपाजी हातपंप उचलताना दाखविण्यात आला होता. मला खरोखरच याची कल्पना नव्हती की, हा सीन एवढा पॉप्युलर होईल, असेही अनिलने सांगितले. 



असो, या १६ वर्षात उत्कर्ष आता मोठा झाला असून, अनिल त्याला घेऊन ‘जीनियस’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. या चित्रपटात उत्कर्ष मुख्य भूमिकेत असेल. याबाबतची घोषणा अनिल लवकरच करणार आहे. अनिलने ‘द हिरो : लव्ह स्टोरी आॅफ अ स्पाय’, ‘अपने’, ‘वीर’ यांसारखे चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘वीर’ या चित्रपटाच्या शूटिंगविषयी बोलायचे झाल्यास अनिल म्हणतोय की, या चित्रपटातील लाल ब्रिजवाल्या सीन्ससाठी मी लखनऊ सरकारचा आभारी आहे. कारण ब्रिज सुरू असतानाही त्यांनी आम्हाला याठिकाणी शूटिंग करण्याची परवानगी दिली होती. हा ब्रिज दोन शहराला जोडलेला होता, त्यामुळे याठिकाणी प्रचंड वाहतूक होती. अशातही आम्ही या ब्रिजवर कार ब्लास्टचा सीन शूट केला. त्यासाठी आम्हाला लखनऊ सरकारचे प्रचंड सहकार्य लाभले. 

Web Title: 16 Years: In the 'Ghadar', the director was responsible for 'these' scenes in danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.