२२ वर्षांनी तोच थरार, तोच जोश; सिक्वलची तारीख ठरली, पण आधी रिलीज होणार 'गदर'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 01:43 PM2023-05-27T13:43:11+5:302023-05-27T13:46:12+5:30
१५ जून २००१ साली गदर आणि लगान हे दोन्ही सिनेमे चित्रपटगृहात झळकले होते
बॉलिवूडचा पाजी म्हणजे सनी देओलचा गदर चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २२ वर्षे झाली. पण, आजही गदर चित्रपटाचे नाव घेताच सनी देओलची ती पाकिस्तानमधील धमक डोळ्यांसमोर उभी राहते. सनी पाकिस्तानमध्ये जाऊन दिलेले हिंदुस्थान झिंदाबादचे नारे अंगावर शहारे आणतात. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाचा सिक्वल आता लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे शुटींग पूर्ण झाले असून दिग्दर्शकाने गदर २ च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केलीय. मात्र, तत्पूर्वी पुन्हा एकदा सिनेमागृहात २००१ मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' चित्रपट सिनेरसिकांना पाहता येईल.
१५ जून २००१ साली गदर आणि लगान हे दोन्ही सिनेमे चित्रपटगृहात झळकले होते. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तर, चित्रपटगृहात या सिनेमांची जादू महिनोंमहिने पाहायला मिळाली. हाऊसफुल्ल गर्दीचे अनेक आठवडे या दोन्ही चित्रपटांनी खेचले. त्यातही सनी देओलचा गदर चित्रपट अफलातून हीट झाला होता. आता, ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांत गदर २ सिनेमा प्रदर्शित होतोय. त्यामुळे, हा सिक्वल पाहण्याचीही उत्सुकता सिनेरसिकांना आहे. तत्पूर्वी, २२ वर्षानंतर पुन्हा एकदा गदर सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.
अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरुन गदर चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येत असल्याचं म्हटलंय. ९ जून रोजी पुन्हा एकदा गदर चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय, असे अमिषाने म्हटले आहे.
दरम्यान, १९९४ साली आलेल्या हम आप के है कोन? या चित्रपटाने सिनेजगतातील बिझनेसचा इतिहास रचला होता. मात्र, हा इतिहास मोडण्याचं काम गदर चित्रपटाने केलं. हम आपके है कोन चित्रपटाचे त्यावेळचे कलेक्शन ७२ कोटी रुपये एवढे होते. मात्र, त्यानंतर, ७ वर्षांनी आलेल्या गदर चित्रपटाने ७६ कोटी रुपये नेट कलेक्शन केले होते. त्यावेळी, या चित्रपट निर्मित्तीसाठी १९ कोटी रुपये खर्च झाले होते.