अभिनेते अखिल मिश्रा यांचा इमारतीवरुन पडून मृत्यू, '3 इडियट्स'मध्ये दुबे लायब्रेरियनची साकारली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 15:18 IST2023-09-21T13:04:47+5:302023-09-21T15:18:51+5:30
अखिल मिश्रा यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून चाहत्यांना या बातमीवर विश्वास बसत नाहीये.

अभिनेते अखिल मिश्रा यांचा इमारतीवरुन पडून मृत्यू, '3 इडियट्स'मध्ये दुबे लायब्रेरियनची साकारली भूमिका
हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते अखिल मिश्रा (Akhil Mishra) यांचं निधन झालं आहे. आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकणारे अखिल मिश्रा यांनी 3 इडियट्स या चित्रपटात लायब्रेरियन दुबेची भूमिका साकारुन सगळ्यांचं लक्ष वेधलं होते. मीडिया रिपोर्टनुसार, काम करत असताना इमारतीवरून पडून अभिनेत्याचा मृत्यू झाला. अखिल मिश्रा यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून चाहत्यांना या बातमीवर विश्वास बसत नाहीये.
रिपोर्टनुसार, ५८ वर्षीय अभिनेते बाल्कनीजवळ काम करत होते, तेव्हा ते उंच इमारतीवरून खाली पडले. दरम्यान अभिनेत्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.अखिल त्यांच्या पश्चात पत्नी सुझान बर्नर्ट आहे. सुझान एक जर्मन अभिनेत्री आहे. पतीच्या निधनाची बातमी ऐकून सुझान यांची अवस्था बिकट झाली आहे.
अखिल यांनी टीव्हीवरही अनेक मालिकांमध्ये काम केले होते. ते उत्तरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, हातिम आणि इतर अनेक लोकप्रिय कार्यक्रमांचा भाग होते. अखिल अनेक चित्रपटांमध्येही दिसले होते. 'डॉन', 'गांधी', 'माय फादर', 'शिखर', 'कमला की मौत', 'वेल डन अब्बा' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.
'3 इडियट्स'मधील लायब्रेरियन दुबेच्या भूमिकेतून अखिल यांना खूप लोकप्रियता मिळाली होती. आमिर खान, शर्मन जोशी, करीना कपूर खान, आर माधवन, बोमन इराणी आणि इतर अनेकांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. "उत्तरन" या लोकप्रिय शोमध्ये उमेद सिंग बुंदेला ही व्यक्तिरेखा साकारूनही त्यांनी आपली छाप सोडली.