Bollywood vs south : 2700 कोटी! संपलं अर्ध साल, साऊथच्या तीनच सिनेमांनी बॉलिवूडचा केला असा हाल!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 06:19 PM2022-07-01T18:19:21+5:302022-07-01T18:21:55+5:30
Bollywood vs south : या वर्षात साऊथचे तीनच सिनेमे बॉलिवूडला पुरून उरले...! 2022 हे वर्ष अर्ध संपलंय आणि या वर्षातील आत्तापर्यंतचे बॉक्स ऑफिसचे आकडे तमाम बॉलिवूडची निराशा करणारे आहेत. साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला अक्षरश: घाम फोडला आहे.
Bollywood vs south : 2022 हे वर्ष अर्ध संपलंय आणि या वर्षातील आत्तापर्यंतचे बॉक्स ऑफिसचे आकडे तमाम बॉलिवूडची निराशा करणारे आहेत. साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला अक्षरश: घाम फोडला आहे. अर्थात हे आमचं मत नाही तर हे आकडेवारी सांगत आहे. अर्ध वर्ष संपलं पण अद्याप बॉलिवूडचे चित्रपट कमाईच्या बाबतीत साऊथ चित्रपटांच्या आसपासही पोहोचू शकलेले नाहीत. नुकत्याच रिलीज झालेल्या कमल हासन यांच्या ‘व्रिकम’ने (Vikram) वर्ल्डवाईड 400 कोटींची कमाई केली. यावर्षी शानदार कमाई करणारा साऊथचा हा तिसरा सिनेमा आहे.
तेलगू, कन्नड, तामिळ चित्रपटांनी रचला विक्रम
चालू वर्षात बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणणारा पहिला सिनेमा ठरला तो एस.एस. राजमौलीचा ‘RRR’. ज्युनिअर एनटीआर आणि रामचरणचा हा सिनेमा यावर्षी 24 मार्चला रिलीज झाला आणि या चित्रपटाने वर्ल्डवाई 1144 कोटी रूपयांची कमाई केली. या कमाईनं बॉलिवूडला सुद्धा धक्का बसला. मग कन्नड फिल्म इंडस्ट्रीतून निघालेला ‘हिरा’ अर्थात सुपरस्टार यशचा ‘KGF 2’ रिलीज झाला. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. या चित्रपटावरही प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्यात. या चित्रपटाने किती कमाई केली तर 1200 कोटी रूपये.
बॉक्स ऑफिसवर तेलगू व कन्नड चित्रपटांचा डंका वाजत असताना तामिळ सिनेमाची एन्ट्री झाली. हा सिनेमा होता ‘विक्रम’. होय, गेल्या 3 जूनला हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने वर्ल्डवाईड 400 कोटींचा आकडा पार केला. आरआरआर, केजीएफ 2 आणि विक्रम या तिन्ही साऊथ सिनेमांची एकूण कमाई बघाल तर ती 2744 कोटींच्या घरात आहे आणि बॉलिवूड या कॅनव्हॉसवर कुठेही नाही.
200 कोटीचा आकडा गाठतानाही दमछाक
बॉलिवूड चित्रपटांची गत पाहून कुठलाही बॉलिवूडप्रेमी निराश होईल. गेल्या 6 महिन्यांत ‘द काश्मीर फाईल्स’चा अपवाद सोडला तर एका चित्रपटालाही 500 कोटींचा आकडा गाठला आलेला नाही. ‘द काश्मीर फाईल्स’ने वर्ल्डवाईड 339.49 कोटींचा बिझनेस केला. यानंतर कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या 2’ने 230.75 कोटींची कमाई करत बॉलिवूडला काहीशी संजीवनी दिली. या दोन चित्रपटांशिवाय यावर्षी रिलीज झालेल्या एकाही बॉलिवूड चित्रपटाला 200 कोटींचा आकडा गाठता आलेला नाही. गंगूबाई काठियावाडीने 173 कोटी कमावले. यानंतर आलेला सम्राट पृथ्वीराज आपटला. जर्सी या चित्रपटाकडेही लोक फिरकले नाहीत. जुग जुग जिओची सुरूवात शानदार राहिली. पण नंतर या कमाईलाही ब्रेक लागला.
येत्या काळात मोठ्या अपेक्षा
2022 वर्ष संपायला आणखी 6 महिने बाकी आहेत आणि या सहा महिन्यात बॉलिवूडकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. शमशेरा, ब्रह्मास्त्र, लाल सिंग चड्ढा, सर्कस असे काही चित्रपट येत्या काळात येणार आहेत. हे चित्रपट कमाई करतील अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात काय होतं ते बघूच.