सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 10:37 AM2024-06-01T10:37:33+5:302024-06-01T10:37:52+5:30

Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आता सलमानच्या हत्येचा आणखी एक कट उघडकीस आला आहे.

A new conspiracy to kill Salman Khan was revealed, weapons were to be ordered from Pakistan | सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं

सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं

अभिनेता सलमान खान(Salman Khan)च्या वांद्रे येथील घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात वेळोवेळी नवी अपडेट समोर येत आहे. दरम्यान आता सलमानच्या हत्येचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याची योजना आखल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्रे विकत घेण्याची योजना होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवून चार जणांना अटक केली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात असलेला गँगस्टर बिश्नोईने त्याचा कॅनडास्थित चुलत भाऊ अनमोल बिश्नोई आणि सहकारी गोल्डी ब्रारसोबत मिळून पाकिस्तानातील एका शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून एके-४७, एम-१६ आणि इतर अत्याधुनिक शस्त्रे खरेदी अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचला जाणार होता. ही माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांना मिळालेल्या टीपनुसार, या प्लॅनमध्ये सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊस आणि त्याच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सना अटक होण्याच्या एक महिन्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळी तयार झाल्याचेही समोर आले आहे. नवी मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे आणि अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याच्या योजनेचा तपास करत आहेत.

सलमान खानच्या घराबाहेर केला होता गोळीबार
१४ एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे भागातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घराबाहेर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला आणि तिथून पळ काढला होता. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक केली. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा कट ऑक्टोबर २०२३ मध्ये रचण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला तपासादरम्यान मिळाली होती. सूत्रधारांच्या सांगण्यावरून शूटर विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी पनवेलमध्ये भाड्याने घरही घेतले होते. त्यांनी येथे दुचाकी घेतली होती. काही दिवसांनंतर दोन्ही शूटर्सना पिस्तुले देण्यात आली. त्यांनी सलमान खानच्या अपार्टमेंटची रेकी केली होती.

पोलीस कोठडीत एका आरोपीचा झाला मृत्यू 
या प्रकरणातील एक आरोपी अनुज थापन याचा पोलीस कोठडीत १ मे रोजी मृत्यू झाला होता. आरोपीने चादरीने गळफास लावून घेतला होता. अनुज थापनच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. अनुज थापननेच पंजाबमधून दोन पिस्तुले आणून पनवेलमधील शूटर्सना दिली होती. गोळीबारात सहभागी असलेल्या हल्लेखोरांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका सदस्याला अलीकडेच राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद रफिक चौधरी (३७) असे आरोपीचे नाव आहे. गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला तो पाचवा आरोपी आहे.

Web Title: A new conspiracy to kill Salman Khan was revealed, weapons were to be ordered from Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.