Video: अंध व्यक्तींच्या बँडने गायलं "पापा कहते है"; गाणं संपल्यावर आमिर खानने दिली मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:41 AM2024-04-23T10:41:03+5:302024-04-23T10:41:21+5:30
आपल्या सर्वांच्या जवळचं अर्थात पापा कहते है गाणं काल मुंबईत लॉंच झालं. यावेळचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय
सध्या राजकुमार रावच्या 'श्रीकांत' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'श्रीकांत'मध्ये राजकुमार अंध व्यावसायिक श्रीकांत बोला यांची भूमिका साकारणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या 'श्रीकांत'च्या टिझरने सर्वांचं मन जिंकलं. अशातच काल 'श्रीकांत' सिनेमातलं बहुचर्चित 'पापा कहते है' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. आमिरचा पहिल्या सिनेमा अर्थात 'कयामत से कयामत तक' मधलं हे गाणं आपल्या सर्वांच्या आवडीचं. हेच गाणं काल 'श्रीकांत' सिनेमाच्या इव्हेंटला अंध व्यक्तींच्या बँडने पुन्हा गायलं. तेव्हा आमिरची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती.
आमिर खान, राजकुमार राव, आलिया एफ, शरद केळकर, उदित नारायण, दिग्दर्शक तुषार हिरानंदानी आणि निर्माती निधी परमार हिरानंदानी यांच्या उपस्थितीत एका दृष्टिहीन बँडने हे गाणं काल सादर केलं. 'पापा कहते हैं 2.0' असं या गाण्याचं नाव असून काल मुंबईत भव्य आणि अनोख्या पद्धतीने गाणं लाँच करण्यात आलं. राजकुमार राव आणि या गाण्याचा ओजी स्टार आमिर खान सुद्धा गाणं गुणगुणताना दिसले.
दृष्टिहीन बँडच्या सदस्यांनी आमिर खानच्या 'आये मेरे हमसफर' या प्रसिद्ध गाण्यासोबतच 'पापा कहते हैं' गाण्याचं कमाल सादरीकरण केलं. हा परफॉर्मन्स संपताक्षणी आमिर खान, राजकुमार राव आणि उदित नारायण यांनी या परफॉर्मन्सला उभं राहून मानवंदना दिली. हे गाणं 'श्रीकांत' सिनेमातही दिसणार आहे. राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला 'श्रीकांत' सिनेमा १० मे २०२४ ला रिलीज होतोय.