आमीर करणार ह्या बायोपिकची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 04:16 PM2018-07-27T16:16:00+5:302018-07-27T16:27:44+5:30
गुलशन यांचा बायोपिक आता 2019 मध्ये क्रिसमसला प्रदर्शित केला जाणार आहे. टी सीरीज आणि 'आमीर खान प्रोडक्शन'ने ही माहिती दिली.
भारतातील प्रसिद्ध म्युझिक कंपनी टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांच्या बायोपिकची चर्चा बऱ्याच काळापासून रंगली आहे. या चित्रपटाला घेऊन विविध चर्चा ऐकायला मिळत आहेत. गुलशन यांचा बायोपिक आता 2019 मध्ये क्रिसमसला प्रदर्शित केला जाणार आहे. टी सीरीज आणि 'आमीर खान प्रोडक्शन'ने ही माहिती दिली. ट्रेड एनालिस्ट कोमल नाहटाने आपल्या ट्विटर हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे.
गुलशन यांच्या बायोपिकचे नाव 'मोगुल' असे असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी आधी अभिनेता अक्षय कुमारने होकार दिला होता व चित्रपटाचा फर्स्ट लूकही जारी झाला होता. पण अचानक अक्षयने हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांचे मानाल तर यामागे दिग्दर्शकासोबतचे त्याचे मतभेद कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘मोगुल’साठी अक्षय कुमारच बेस्ट असल्याचे गुलशन कुमारची मुलगी तुलसी कुमार हिने म्हटले होते. अक्षय व गुलशन कुमार यांच्यात बऱ्याच अंशी साम्य आहे. अक्षय आणि आम्ही पंजाबी आहोत. तो दिल्लीचा आहे. माझे वडीलही दिल्लीचे होते, असे ती म्हणाली होती. त्यानंतर सलमानचे नाव समोर आले होते. पण, त्याचीही वर्णी लागली नाही. निर्माते भूषण कुमार यांनी लवकरच चित्रपटात बॉलिवूडमधील स्टार कलाकाराला घेणार असल्याचे सांगितले होते. आता या चित्रपटाची निर्मिती आमीर खान करतो आहे. मात्र अद्याप गुलशन कुमार यांची भूमिका कोण साकारणार हे गुलदस्त्यात आहे.
गुलशन कुमार यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार आहेत. हा बिग बजेट चित्रपट असणार असल्याचे बोलले जाते. आमीर खान बायोपिकची निर्मिती करणार असल्याचे समजल्यापासून तोच गुलशन कुमार यांची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरूवात होणार आहे.