आमिर खानने धुम्रपान करणं कायमचं केलं बंद! म्हणाला- "मला सिगरेट ओढण्यात मजा यायची पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:13 IST2025-01-11T11:13:09+5:302025-01-11T11:13:42+5:30
लेकाच्या सिनेमासाठी आमिरने स्मोकिंग कायमचं सोडलं. 'लव्हयापा' सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी मनातलं बोलला (aamir khan)

आमिर खानने धुम्रपान करणं कायमचं केलं बंद! म्हणाला- "मला सिगरेट ओढण्यात मजा यायची पण..."
काही दिवसांपूर्वी आमिर खान लेक जुनेद खानच्या आगामी सिनेमासाठी धुम्रपान करणं कायमचं बंद करणार, अशी चर्चा सुरु होती. आमिरने याविषयी कोणताही ऑफिशिअल वक्तव्य केलं नव्हतं. परंतु काल 'लव्हयापा'च्या ट्रेलरवेळेस आमिर खानने याविषयी मोठा खुलासा केला. आमिरने काल लेक जुनैद खानचा आगामी सिनेमा 'लव्हयापा'चा ट्रेलर लाँच इव्हेंटला हजेरी लावली होती. त्यावेळी आमिरने धुम्रपान करणं कायमचं सोडलं असल्याचा खुलासा केला.
आमिरने स्मोकिंग केलं कायमचं बंद
आमिर म्हणाला, "मी स्मोकिंग करणं बंद केलंय. धुम्रपान अशी गोष्ट होती जी मला आवडायची. आता काय बोलू मी, खोटं बोलू शकत नाही. इतकी वर्ष मी सिगरेट पितोय. त्यानंतर पाइप वगैरे प्यायलोय. या गोष्टींनी मला आनंद मिळायचा. पण या गोष्टी आरोग्यासाठी अजिबात चांगल्या नाहीत. कोणीच हे करु नये. त्यामुळे या वाईट सवयी मी सोडल्यात याचा मला आनंद आहे. जे लोक ऐकत आहेत त्यांनाही मी एवढंच सांगेन की, या सवयी चांगल्या नाहीत. तुम्हीही करु नका."
आमिर पुढे म्हणाला, "मला स्मोकिंग सोडायचं होतं त्यात मला चांगलं निमित्त सापडलं. माझ्या लेकाच्या करिअरची सुरुवात होतेय त्यामुळे मी मनोमन एक मन्नत मागितली होती. हा सिनेमा चालेल किंवा नाही चालणार माहित नाही, पण एक बाप म्हणून जुनैदसाठी मी या गोष्टीचा त्याग केलाय. मला आशा आहे की, युनिव्हर्समध्ये काहीतरी घडेल आणि तुम्हीही या सिनेमासाठी प्रार्थना करा." आमिरचा लेक जुनैद खान आणि श्रीदेवीची लेक खुशी कपूरचा आगामी 'लव्हयापा' सिनेमा ७ फेब्रुवारीला रिलीज होतोय.