"मी खूप चुका केल्या", 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाबद्दल पहिल्यांदाच बोलला आमिर खान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 01:05 PM2024-02-24T13:05:06+5:302024-02-24T13:06:03+5:30
" संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली पण...", 'लाल सिंग चड्ढा'च्या अयशावर आमिरने सोडलं मौन
अभिनेता आमिर खानने अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले. पण, मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या आमिरलाही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कठीण काळातून जावं लागलं. २०२२मध्ये प्रदर्शित झालेला आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' हा ड्रीम प्रोजेक्ट होता. फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड सिनेमाचा हा रिमेक होता. या सिनेमाकडून आमिरला खूप अपेक्षा होत्या. पण, चाहत्यांच्या अपेक्षेस खरा न उतरल्याने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. हे आमिरसाठी अनपेक्षित होतं. 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाबद्दल आता पहिल्यांदाच आमिरने भाष्य केलं आहे.
'लाल सिंग चड्ढा' फ्लॉप झाल्यानंतर दुखावलो गेल्याचं आमिरने मुलाखतीत सांगितलं. त्याने 'एबीपी आयडिया ऑफ इंडिया समिट' मध्ये हजेरी लावली होती. आमिर म्हणाला, "हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास होता. अद्वैत, करीना आणि संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली होती. पण, त्याचा उपयोग झाला नाही. दोन गोष्टी घडल्या, खूप काळानंतर माझा सिनेमा फ्लॉप गेला आणि त्यानंतर माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी घरी येऊन मी ठिक आहे का? असं विचारत होते. सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर मला खूप प्रेम मिळत आहे, हे मला जाणवलं. पण, अपयश तुम्हाला तुमचं नेमकं काय चुकलं हे शिकवतो. कथा सांगण्यात तुमच्याकडून कोणती चूक झाली, हे जाणून घेण्याची संधी तो तुम्हाला देतो."
"हा माझ्यासाठी खूप मोठा धडा होता. मला आठवतंय मी एकदा किरणला म्हणालो होतो की मी या सिनेमात खूप चुका केल्या आहेत. पण, नशीब मी सगळ्या चुका या एकाच सिनेमात केल्या आहेत. सिनेमा चालला नाही म्हणून मी दुखावलो होतो," असंही पुढे आमिरने सांगितलं.
आमिर खान मुख्य भूमिकेत असलेल्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं होतं. या सिनेमात आमिर खान, करीना कपूर, नागा चैतन्य, मोना सिंह यांच्या मुख्य भूमिका होत्या. सध्या आमिर 'लापता लेडिज' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. किरण रावने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आमिरने या सिनेमाच्या निर्मिती बाजू सांभाळली आहे.