​आमिरची 'ही' गोष्ट भावली गिरिश कुलकर्णीला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2016 09:20 PM2016-12-18T21:20:15+5:302016-12-19T10:32:21+5:30

सतीश डोंगरे ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अशी ख्याती असलेला आमिर खान त्याच्या कामातून प्रेक्षकांना जेवढा आकर्षित करत असतो, तेवढेच त्याचे सहकलाकारदेखील ...

Aamir's 'This' story Bharathi Girish Kulkarni ... | ​आमिरची 'ही' गोष्ट भावली गिरिश कुलकर्णीला...

​आमिरची 'ही' गोष्ट भावली गिरिश कुलकर्णीला...

googlenewsNext
<
strong>सतीश डोंगरे


‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अशी ख्याती असलेला आमिर खान त्याच्या कामातून प्रेक्षकांना जेवढा आकर्षित करत असतो, तेवढेच त्याचे सहकलाकारदेखील त्याच्या कामातील ‘परफेक्टनेस’वरून प्रभावी होत असतात. आगामी ‘दंगल’मध्ये हानिकारक बापूच्या भूमिकेत असलेला आमिर चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच प्रकाशझोतात आला आहे. फिटनेसपासून ते कुस्ती खेळण्याच्या पद्धतीवरून तो प्रेक्षकांना भावत आहे. तसेच त्याचे काही सहकालकारदेखील असे आहेत, जे आमिरच्या कामाच्या पद्धतीवर फिदा झाले आहेत. त्यातीलच एक मराठमोळं नाव म्हणजे गिरीश कुलकर्णी. ‘दंगल’मध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या गिरीश कुलकर्णीच्या मते आमिरमध्ये स्टारपण अजिबात बघावयास मिळत नाही. तो नेहमीच विद्यार्थ्यांच्या भूमिकेत असतो. नवीन गोष्टी शिकण्याच्या हावरटपणामुळेच त्याला ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अशी बिरुदावली मिळाली आहे. दंगलनिमित्त गिरीश कुलकर्णीशी संवाद साधला असता, त्याने अनेक किस्से उलगडत आमिर खानचे कौतुक केले. 

आमिर खानसोबत काम करताना तुला त्याची कुठली गोष्ट भावली?
बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता म्हणून आमिर खानचे नाव घेतले जाते. प्रत्येक सीन्स परफेक्ट असावा यासाठी त्याची जबरदस्त धडपड असते. विशेष म्हणजे हे करत असताना त्याच्यात स्टारपण अजिबात बघावयास मिळत नाही. ‘जणू काही तो एक विद्यार्थी आहे अन् त्याला ती गोष्ट शिकायची आहे’ याच भावनेतून तो सेटवर येत असतो. बारकावे समजून घेत तो त्या सीन्ससाठी स्वत:ला अक्षरश: वाहून घेत असतो. आमिरसोबत शूटिंग करताना रिटेक हा प्रकार नगण्यच म्हणावा लागेल. कारण जोपर्यंत त्या सीनला योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत पुढच्या सीन्सचा विचारच केला जात नाही. आमिर स्क्रीप्टनुसार स्वत:मध्ये बदल करीत असतो. त्यामुळेच प्रत्येक चित्रपटाचा त्याचा लुक हटके आणि अखेरपर्यंत सिक्रेट असतो. या चित्रपटासाठी त्यांनी केलेली मेहनत कौतुकास्पद आहे. 

प्रशिक्षकाची भूमिका साकारताना तुला स्वत:मध्ये काही बदल करावे लागलेत का?
होय, परंतु आमिरने ज्यापद्धतीने स्वत:मध्ये बदल केलेत त्यातून माझी नक्कीच सुटका झाली. अर्थात भूमिकेला आवश्यक असते तर मीही फिटनेस बनविण्याचा विचार केला असता. मात्र चित्रपटात प्रशिक्षकाची भूमिका साकारताना मला कुस्ती या खेळाविषयी सर्वच माहिती जाणून घ्यावी लागली. मुंबई येथील फिटनेस मास्टर शैलेश परुळेकर यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. तसेच कुस्ती या खेळाविषयी उपलब्ध पुस्तकांचे वाचनही केले. पण परुळेकरांकडून प्रशिक्षकाची मानसिकता, खेळाडूंना शिकवत असताना चालण्याच्या - बोलण्याच्या त्यांच्या पद्धती, त्यांचे निरीक्षण अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी त्यांच्याकडून समजून घेतल्या. त्यानंतर सेटवरही आमचे प्रशिक्षक कृपाशंकर सिंह पूर्णपणे उपलब्ध असायचे. दृश्य सुरू असताना एखादी गोष्ट त्यांना खटकली तर ते पटकन सांगायचे की, हे असे हातवारे केले जात नाहीत, मग त्यात ते बदल सांगायचे. इतक्या शांतपणे, सहजतेने मी ही भूमिका करू शकलो. चित्रपटात मी गीता आणि बबिता यांच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 



तू अभिनेत्याबरोबरच लेखक असल्याने या चित्रपटाच्या पटकथेबद्दल तुला काय वाटते?
मुळात ‘दंगल’ची संहिता खूप वेगळी आणि सशक्त आहे. महावीर फोगट यांच्या गोष्टीतच एक भाव आहे आणि तो संहितेत अचूक पकडला गेला आहे. मी चित्रपटात अभिनेता म्हणून काम करत असलो तरी मूळचा एक लेखक असल्याने या चित्रपटाच्या पटकथेबद्दल मला खूप उत्सुकता होती. एक दिग्दर्शक म्हणून नितेश तिवारी यांनी आपल्याला या कथेतून काय सांगायचे आहे, हा संदेश योग्य पद्धतीने दिला आहे. किंबहुना ते लेखन प्रक्रियेपासूनच यात सहभागी असल्याने अगदी बारीक गोष्टीचाही त्यांनी विचार केला आहे. शिवाय, इतके मोकळे वातावरण असल्याने प्रत्येक कलाकाराला आपल्याला काय सांगायचे याची पूर्णपणे मुभा होती. एखाद्या प्रायोगिक नाटकाच्या तालमीचे जसे वातावरण असते तसेच वातावरण या चित्रपटाच्या निमित्ताने सेटवर होते. त्यामुळे चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असले तरी ती एक समूहकला आहे, हे यातून स्पष्टपणे दिसत होते.

‘देऊळ’चे दिग्दर्शन, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ हा कॉमेडीपट अन् आता ‘दंगल’सारखा हिंदी चित्रपट, या प्रवासाचे वर्णन तू कसे करशील?
‘देऊळ’ या चित्रपटाने ओळख दिली, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटातून एक गंभीर विषय कॉमेडीतून हाताळता आला अन् आता ‘दंगल’मधून दिग्दर्शक नितेश तिवारी आणि अभिनेता आमिर खान यांसारख्या भारदस्त जोडीसोबत काम करण्याची संधी मिळाली. या सर्व घडामोडी करिअरचा ग्राफ वाढविणाºया असून, यामुळे मी आनंदी आहे. पुढची वाटचालही आनंददायी व्हावी यासाठी काही प्रोजेक्टवर काम करीत आहे. लगेचच उलगडा करणे घाईचे ठरेल, परंतु नक्कीच ‘देऊळ’सारखीच एखादी कलाकृती घेऊन मी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Aamir's 'This' story Bharathi Girish Kulkarni ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.