बारीक होण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया या अभिनेत्रीला पडली महागात, वयाच्या ३१व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 06:05 PM2021-05-04T18:05:33+5:302021-05-04T18:06:06+5:30
अचानक झालेल्या या अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला होता.
तेलगू सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री आरती अग्रवाल हिने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती. तिचा चिरंजिवीसोबतचा इंद्रा द टायगर हा चित्रपट हिट ठरला होता. २०१५ साली या अभिनेत्रीचं निधन झाल्याचं कळताच सगळ्यांना धक्का बसला होता. बारीक होण्याच्या नादात आरती अग्रवालने जीव गमावला आहे.
अभिनेत्री आरती अगरवालचा लिपोसक्शन नावाच्या शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला होता. या शस्त्रक्रियेसाठी ती अमेरिकेतील न्यू जर्सी इथल्या खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. शस्त्रक्रियेनंतर काही तासात तिची तब्येत बिघडली होती. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अवघ्या ३१ व्या वर्षी या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. आरतीने अमेरिकेत ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी हैदराबाद इथल्या डॉक्टरांकडे या शस्त्रक्रियेबाबत विचारले होते. ही शस्त्रक्रिया तुझ्या जीवावर बेतू शकते असे सांगत या डॉक्टरांनी तिला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. ही शस्त्रक्रिया करू नकोस तुझ्या त्वचेखाली चरबी नाही आहे, असे या डॉक्टरांनी तिला सांगितले होते.
आरती अग्रवालने चित्रपटसृष्टीत टीकायचे असेल तर आपल्याला बारीक व्हावे लागेल असे मनाशी ठरवले होते. मात्र यासाठी तिने व्यायामाचा कठीण मार्ग निवडण्याऐवजी शस्त्रक्रियेचा मार्ग निवडला असा तिच्यावर आरोप होतो. जाड असल्यामुळे आरतीला चित्रपट मिळणे कमी झाले होते, यामुळे ती तणावाखाली होती. २००८ साली तिला फक्त ४ चित्रपट मिळाले होते. त्यामुळे आरतीने शरीरातील अतिरिक्त चरबी हटवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिला शस्त्रक्रिया खूप महागात पडली.