'आशिकी'मुळे अनू अग्रवालवर आली होती बेघर व्हायची वेळ, वाचा हा रंजक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 06:30 AM2020-02-08T06:30:00+5:302020-02-08T06:30:02+5:30
आशिकी या चित्रपटामुळे अनू अग्रवालला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये नव्वदीच्या दशकातील आशिकी या गाजलेल्या चित्रपटाची टीम हजेरी लावणार आहे.
आशिकी हा चित्रपट नव्वदीच्या दशकात चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील सगळ्याच गाण्यांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या ओठावर रुळलेली आहेत. या चित्रपटात राहुल रॉय, अनू अग्रवाल आणि दीपक तिजोरी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 30 वर्षं नुकतेच झाले असून याच निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावणार आहे.
या तिन्ही कलाकारांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेसचे रंजक किस्से प्रेक्षकांना सांगितले. आशिकी या चित्रपटामुळे राहुल रॉय, अनू अग्रवाल यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटाने आपले जीवन कसे बदलून टाकले हे सांगताना अनू म्हणाली, “मला आठवतेय, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसर्या दिवशी माझ्या घराच्या बाहेर अनेक लोक जमा झाले होते, ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले होते. मी नेहमीप्रमाणे सकाळी पोहायला जाण्यासाठी निघाले तर माझ्या घराबाहेर माझी एक झलक पाहण्यासाठी शेकडो लोक जमा झाले होते. इतकेच नाही तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतींवर ‘अनू, राहुलने चित्रपटात केले, तसेच प्रेम मी तुझ्यावर करतो’ अशा आशयाचे संदेश देखील लावलेले होते. त्याकाळी ऑटो रिक्षांमध्ये देखील आशिकीचीच गाणी लावली जात असत.”
यापुढे अनुने सांगितले की, माझी लोकप्रियता या चित्रपटामुळे प्रचंड वाढल्याने रोजच घराच्या बाहेर गर्दी व्हायची. तसेच अनेक पत्रकार मुलाखतींसाठी घरी यायचे. या सगळ्याचा माझ्या घरमालकाला त्रास होत होता. अखेरीस माझ्या घरमालकाने मला तातडीने घर सोडण्याची नोटीस दिली. मी मुंबईत एकटेच राहात होते. त्यामुळे घर कुठे शोधू हेच मला कळत नव्हते.”
या कार्यक्रमात अनूने आणखी एक खास गोष्ट सांगितली. तिने म्हटले की, महेश भट्ट सर मला ‘वन टेक आर्टिस्ट’ म्हणत. कारण मी सगळी दृश्ये एका टेकमध्ये दिली होती.